बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची जोरदार चर्चा होती. त्याचप्रमाणे त्यांना लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र हे वृत्त पूर्णपणे चुकीचं असल्याचं बिग बींनी स्पष्ट केलं आहे. एका वृत्तवाहिनीचा व्हिडीओ पोस्ट करत बिग बींनी ‘ती न्यूज फेक आहे, बनावट आहे’, असं ट्विटरवर स्पष्ट केलं.

बिग बींचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना ११ जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यापाठोपाठ अभिषेक बच्चनचीही करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे या दोघांना ११ जुलैच्या रात्री नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र आता त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची बातमी पसरली होती. त्यावर बिग बींनी ट्विट केलं, ‘ती बातमी चुकीची, बेजबाबदार, फेक आणि खोटी आहे.’

अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन यांच्यासोबत ऐश्वर्या राय बच्चन व आठ वर्षीय आराध्यालाही करोनाची लागण झाली आहे. या चौघांवर उपचार सुरू आहेत. “अमिताभ व अभिषेक यांची प्रकृती स्थिर असून उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत. त्यांना किमान आणखी सात दिवस तरी रुग्णालयात राहावं लागणार आहे”, अशी माहिती रुग्णालयाने १६ जुलै रोजी दिली होती. बिग बी स्वत: सोशल मीडियावर सक्रिय आहेत. ट्विटर, इन्स्टाग्रामवर ते पोस्टसुद्धा लिहित आहेत.