Femina Miss India 2018 . सौंदर्यस्पर्धांमध्ये मानाच्या समजल्या जाणाऱ्या फेमिना मिस इंडिया या स्पर्धेच्या विजेतेपदी तामिळनाडूच्या अनुकृती वास हिचं नाव जाहिर करण्यात आलं आहे. ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लर हिने अनुकृतीला ‘मिस इंडिया’चा मुकूट घातला.
सौंदर्य स्पर्धांमध्ये सहसा फक्त सौंदर्याच्याच बळावर विजेत्यांचं नाव निश्चित केलं जातं असं नाही. तर त्याशिवाय इतरही काही गोष्टी नजरेत घेतल्या जातात. अनुकृतीनेही या स्पर्धेत तिला विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचं उत्तर देत हा किताब तिच्या नावे केला. ‘आयुष्यात सर्वात चांगला शिक्षक कोण, यश की अपयश?’, या प्रश्नाचं उत्तर देत अनुकृतीने सर्वांचीच मनं जिंकली.

‘माझ्या मते अपयश आपल्याला बरंच काही शिकवून जातं. ज्यावेळी आयुष्यात सतत तुमच्या वाट्याला यश येतं तेव्हा एका वळणावर तुम्ही समाधान व्यक्त करु लागता ज्यामुळे जीवनाचा प्रवास कुठेतरी थांबतो. पण, सतत अपयश तुमच्या वाट्याला आल्यानंतर तुमच्यात एक प्रकारची वेगळीत शक्ती संचारते जी तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी मेहनत घेण्यास प्रवृत्त करते. ध्येयप्राप्ती होईपर्यंत मग तुम्ही अथक परिश्रम करु लागता. माझ्यामते आज मी आयुष्यात ज्या ठिकाणी उभी आहे, त्यासाठी माझ्या वाट्याला आलेलं अपयशच कारणीभूत आहे. एका खेडेगावातून बाहेर येत मी या टप्प्यावर पोहोचली आहे’, असं अनुकृती म्हणाली. आपल्या आईव्यतिरिक्त इतर कोणीही या प्रवासात आपली साथ दिली नाही. पण, तरीही अपयश आणि आपल्या वाट्याला आलेली निंदा या बळावरच हे यश मला मिळाल्याचं तिने सांगितलं.

वाचा : Alia Bhatt-Ranbir Kapoor: आलिया- रणबीरच्या रिलेशनशिपविषयी काय म्हणाली पूजा भट्ट?

भारतातील विविध राज्यांमधून आलेल्या ३० सौदर्यवतींमध्ये ‘काँटे की टक्कर’ होती. अखेर यात तामिळनाडूच्या अनुकृती वासने ‘मिस इंडिया २०१८’चा किताब पटकावला. तर हरयाणाची मीनाक्षी चौधरी ही दुसऱ्या आणि आंध्र प्रदेशची श्रेया राव तिसऱ्या स्थानी राहिली.