‘कजरा रे’, ‘कुन फाया कुन’ यांसारख्या गाण्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारा गायक जावेद अलीने पहिल्यांदाच एका मराठी चित्रपटातील गाणं गायलं आहे. आगामी ‘मेमरी कार्ड’ या चित्रपटातील ‘मन उगाच हासते’ हे गाणं जावेदने गायलं असून प्रितेश कामत आणि मितेश चिंदरकरने संगीतबद्द केलं आहे. माझ्यासाठी हे ‘साँग ऑफ द इयर’ असेल, अशी प्रतिक्रिया जावेदने दिली आहे.

‘मी अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. प्रत्येक भाषेतल्या गाण्याची एक वेगळीच मेलडी असते, जी मी अनुभवली आहे. मात्र, हे माझ्यासाठी ‘साँग ऑफ द इयर’ असेल. या गाण्याचा मी पुरेपूर आनंद लुटला. माझे गुरू आणि माझे आदर्श मोहम्मद रफी यांच्या गाण्यांना असलेला गोडवा आणि साधेपणा मी या गाण्यात उतरवण्याचा प्रयत्न केला आहे. गाण्याच्या सुरुवातीला असलेली ३० सेकंदांची पियानो ट्यून तुम्हाला अलगद प्रेमाच्या दुनियेची सफर करून आणेल यात काही शंका नाही,’ असं तो म्हणाला.

वाचा : ‘केदारनाथ’चा वाद कोर्टात; सारा अली खानचे पदार्पण लांबणीवर 

या चित्रपटाची निर्मिती, दिग्दर्शन आणि संगीत प्रितेश कामत —मितेश चिंदरकर या जोडगोळीने केले आहे. मराठी चित्रपट क्षेत्रात दाखल झालेल्या प्रितेश—मितेश यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. कोकणचं निसर्गरम्य सौंदर्य, चार मित्रांची अनोखी मैत्री, तरुणाईच्या उंबरठय़ावर पाय ठेवताना हळुवार उमलणारं प्रेम आणि अति उत्साहात एका चौकडीची उडालेली धांदल असं एकंदरीत कथासार असलेला ‘मेमरी कार्ड’ हा चित्रपट येत्या २ मार्च २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.