मल्याळम चित्रपटांतील सुपरस्टार मोहनलाल यांचा जन्म २१ मे १९६० रोजी केरळातील एलनथूर याठिकाणी झाला. अभिनेत्यासोबतच ते निर्माते, गायक आणि थिएटर आर्टिस्टसुद्धा आहेत. मल्याळम चित्रपटसृष्टीतील ते महानायक आहेत. त्यांचे वडील विश्वनाथन नायर हे प्रख्यात वकील होते. मोहनलाल यांना लहानपणापासूनच अभिनयात, कलेत रस होता. ते विविध नाटकांमध्ये भाग घ्यायचे.

मोहनलाल यांचं करिअर-

१९७८ मध्ये मोहनलाल यांचा पहिला चित्रपट ‘थिरनोत्तम’ प्रदर्शित झाला असला. मात्र हा चित्रपट सेन्सॉरच्या कचाट्यात अडकल्याने कधीच प्रदर्शित होऊ शकला नाही. त्यानंतर १९८० मध्ये त्यांनी ‘मंजिल विरिन्जा पूक्कल’ या चित्रपटामुळे यश मिळालं. या चित्रपटात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. त्यावेळी हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. इथूनच त्यांच्या यशस्वी करिअरची खरी सुरुवात झाली.

मोहनलाल यांची लोकप्रियता इतकी वाढली की १९८२ ते १९८६ या कालावधीत दर पंधरा दिवसांनी त्यांचे चित्रपट प्रदर्शित होऊ लागले. १९८३ मध्ये त्यांनी २५ हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. ‘राजाविन्टे माकन’ या चित्रपटात डॉनची भूमिका साकारल्यानंतर त्यांच्या लोकप्रियतेत तुफान वाढ झाली. ‘वानप्रस्थम’ चित्रपटात त्यांनी कथकली नृत्य कलाकाराची भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आंतरराष्ट्रीय स्तरावरही या चित्रपटाचं खूप कौतुक झालं होतं. कान्स चित्रपट महोत्सवासाठी या चित्रपटाची निवड झाली होती.

अभिनयासोबतच मोहनलाल यांना ताइक्वांदोची फार आवड आहे. २०१२ मध्ये वर्ल्ड ताइक्वांदोकडून त्यांना ‘ब्लॅक बेल्ट’ मिळाला. इतकंच नव्हे तर ते प्रोफेशनल रेसलरसुद्धा आहेत. २००१ मध्ये भारत सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. मोहनलाल यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी नऊ वेळा नामांकन मिळालं. तर चार वेळा त्यांनी पुरस्कार पटकावला. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चनसुद्धा मोहनलाल यांचे चाहते आहेत.

संपत्ती- 

दुबईतील बुर्ज खलिफामध्ये मोहनलाल यांचा एक फ्लॅट आहे. २९व्या मजल्यावर त्यांचा आलिशान फ्लॅट आहे. २०११ मध्ये त्यांनी हा फ्लॅट खरेदी केला होता. त्यांच्याकडे मर्सिडीज बेंज, बीएमडब्ल्यू, जॅग्वार आणि रेंज रोवर यांसारख्या महागड्या गाड्या आहेत. चित्रपट निर्मिती आणि वितरणाशिवाय त्यांचा मसाला पॅकेजिंग आणि रेस्तराँचाही व्यवसाय आहे. त्यांना दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अंबानी म्हटलं जातं. त्यांचं लाइफस्टाइल हे कोणा राजा-महाराजांपेक्षा कमी नाही.