प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चढ-उतार हे येतच असतात. कधी चांगला काळ असतो तर कधी वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागते. छोट्या पडद्यावरील अभिनेत्री नूपुर अलंकारच्या आयुष्यातदेखील असेच काहीसे सुरु आहे. ती सध्या तिच्या आयुष्यातील खराब काळाला सामोरी जात असे म्हणायला हरकत नाही. सध्या तिच्याकडे रोजच्या खर्चासाठी देखील पैसे नाहीत.

काही दिवसांपूर्वी गृहनिर्माण क्षेत्रातील ‘एचडीआयएल’ समूहाशी निगडित कर्ज घोटाळ्यामुळे रिझव्‍‌र्ह बँकेने ‘पीएमसी बँके’ला २४ सप्टेंबर रोजी नोटीस पाठवली होती. सहा महिन्यांसाठी रिझव्‍‌र्ह बँकेने पीएमसी बॅंकेच्या ठेवीदारांना खात्यातून रक्कम काढण्यावर मर्यादा आणली आहे. बँकेवर २४ सप्टेंबर रोजी निर्बंध लादताना लागू केलेल्या सर्व प्रकारच्या खात्यांमधून १,००० रुपये काढण्याची मर्यादा दोनच दिवसांत १०,००० रुपये करण्यात आली होती. त्यानंतर आठवडाभरात ती २५,००० रुपयांपर्यंत वाढविण्यात आली . ही मुभा बँकेवर निर्बंध असेपर्यंत, सहा महिन्यांसाठी लागू असेल. म्हणजे सहा महिन्यांत खात्यातून कमाल २५,००० रुपयांर्पयची रक्कम काढता येणार आहे. नूपुरचे खाते देखील या बॅंकेमध्ये आहे.

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये नूपुरने पीएमसी बॅंकेवर लादण्यात आलेल्या निर्बंधामुळे होणारा त्रास सांगितला आहे. ‘सध्या मी खूप मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. माझे दुसऱ्या बॅंकमध्ये खाते होते पण काही दिवसांपूर्वीच मी पीएमसी बॅंकमध्ये ट्रान्सफर करुन घेतले’ असे नूपुर म्हणाली आहे.

‘माझी बहिण, आई, बाबा, पती, सासरे आणि माझी मेहनतीची कमाई ही पीएमसी बँकेमध्ये अडकली आहे. रिझर्व्ह बँकेने लावलेल्या निर्बंधामुळे सुरुवातीला खात्यांमधून १,००० रुपये काढता येत होते. दोन दिवसात ही मर्यादा वाढवून १०,००० वर आणली. त्यानंतर आठवडाभरात ती २५,००० रुपयांपर्यंत वाढविण्यात आली. पण ही रक्कम सहा महिन्यातून एकदा काढता येणार आहे. आम्ही पैशांशिवाय कसे जगणार? नुकताच बँकेने शैक्षणिक कर्ज आणि वैद्यकीय आपतकालीन परिस्थितीमध्ये ५०,००० ते १ लाख रुपये काढण्यास परवानगी दिली आहे. माझ्या कुटुंबातील एक सदस्य आजारी आहे. पण आम्ही तिला दवाखान्यात अॅडमीट करु शकत नाही. कारण आमचे कोणतेच कार्ड सुरु नाही’ असे नूपुर पुढे म्हणाली.

‘बँकेत सर्व पैस अडकले असल्यामुळे मला माझे दागिने विकावे लागत आहेत. मी एका अभिनेत्री कडून ३००० हजार रुपये उधारीवर घेतले आहेत. मी आता पर्यंत माझ्या मित्र परिवाराकडून ५०,००० हजार रुपये उधारीवर घेतले आहेत’ असे नूपुरने म्हटले आहे.

नूपुरने ‘स्वरागिनी’, ‘अगले जनम मोहे बिटिया कीजो’ आणि ‘फुलवा’ या मालिकांमध्ये काम केले आहे. तिच्या या मालिकांमधील भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीला उतरल्या आहेत.