सध्या गाण्यांच्या रिमिक्स आणि रिक्रिएटेड व्हर्जनचा ट्रेण्डच आला आहे. जुनी गाणी नव्या रुपात आणि नव्या अंदाजात आताच्या चित्रपटांमध्ये सादरी केली जातात. पण या नवीन व्हर्जनमुळे जुन्या गाण्यातील रस निघून जातो असं मत अनेकजण मांडतात. काही दिवसांपूर्वी ‘मित्रों’ या चित्रपटातील ‘चलते चलते’ हे गाणं प्रदर्शित झालं. ‘पाकिझा’ या मीना कुमारी यांच्या चित्रपटातील लता मंगेशकर यांच्या आवाजातील हे मूळ गाणं आहे. यावर नाराज होत लता मंगेशकर यांनी रिक्रिएटेड व्हर्जनविषयी आपलं मत व्यक्त केलं.

‘चलते चलते युहीं कोई मिल गया था..’ या मूळ गाण्याला गुलाम मोहम्मद यांनी संगीतबद्ध केलं होतं. तर नवीन व्हर्जन तनिष्क बागचीने संगीतबद्ध केलं आहे. लता मंगेशकर यांनी हे व्हर्जन अद्याप ऐकलं नाही, पण एकंदरीत गाणी रिक्रिएट करण्यावर आपली नाराजी व्यक्त केली. याविषयी त्या म्हणाल्या की, ‘जुनी गाणी रिमिक्स करण्याच्या ट्रेण्डमुळे मला खूप दु:ख होतं. बऱ्याचदा रिमिक्स गाण्यांमध्ये मूळ गाण्याचे बोलदेखील बदलले जातात. ते बदलण्याची परवानगी त्यांना कोण देतं? गीतकारांच्या कल्पकतेशी अशाप्रकारे छेडछाड करण्याचा हक्क कोणालाच नाही.’

याआधीही बऱ्याच गायकांनी रिक्रिएटेड गाण्यांच्या ट्रेण्डबाबत नाराजी व्यक्त केली होती. पार्श्वगायिका अल्का याज्ञिक यांच्या ‘दिलबर दिलबर’ या सुपरहिट गाण्याचं नवीन व्हर्जन ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटात पाहायला मिळालं. यावर ‘जुनी सुपरहिट ठरलेली गाणी उचलून आणि त्यांची चिरफाड करून सादर करण्यापेक्षा ही लोकं नवीन गाणी का तयार करत नाहीत,’ असं अल्का म्हणाल्या होत्या.