आजकालच्या जगात सौंदर्याला किती महत्त्व आहे हे वेगळे काही सांगायला नको. त्यातून मुलींच्या नजरेत तर सौंदर्य इतके महत्त्वाचे आहे की ब्युटी टीप्स म्हटलं की मैत्रिणींमध्ये चर्चेचे फड रंगतात. आपले सौंदर्य कसे जपावे याविषयीच्या अनेक टीप्स आपल्याला इंटरनेटवर सहज मिळतात. त्यासंबंधीची माहिती देणारी व्यक्तीही तितकीच सुंदर दिसणारी असते. पण जर एखाद्या अॅसिड हल्ल्याला बळी पडलेल्या मुलीने या टीप्स दिल्या तर..
रेश्मा बानो कुरेशी या अॅसिड हल्ल्यातील पीडितेचा ब्युटी टीप्स देतानाचा एक व्हिडिओ गेल्यावर्षी प्रदर्शित झाला होता. या व्हिडिओला बरीच प्रसिद्धीही मिळाली. पण या व्हिडिओमागचे उद्दिष्ट हे ब्युटी टीप्स देणं नसून अॅसिड विक्री रोखणं हे आहे. बाजारात सहज उपलब्ध असलेले अॅसिड आणि त्याची विक्री यांना आळा घालण्यासाठी या व्हिडिओद्वारे मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेला कान मधील ‘ग्लासः लायन फॉर चेन्ज अवॉर्ड’ या पुरस्काराने गौरविण्यात आले.
ऑगिल्व्ही आणि मॅथेर यांची संकल्पना असलेल्या या मोहिमेसाठी दिल्लीतील एका स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेतला. या संस्थेने ‘मेक लव्ह नॉट स्कार्स’ (‘एमएलएनएस’) अंतर्गत अॅसिड हल्ल्याला बळी पडलेल्या मुलींना पुनर्वसनाद्वारे एका सामान्य व्यक्तीप्रमाणे जगण्याची संधी देण्यात आली. जेव्हा आम्हाला पुरस्कार मिळाल्याचे कळले तेव्हा खूप आनंद झाला. हे केवळ संस्थेतील सर्व सहका-यांमुळे साध्य होऊ शकले आहे, असे ‘एमएलएनएस’च्या संस्थापक रिया शर्मा म्हणाल्या.