सणांचं औचित्य साधत एक तरी मोठा चित्रपट प्रदर्शित करायचा ही बॉलिवूडची प्रथा आहे. त्यानुसार आजवर अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. विशेष म्हणजे यंदाची दिवाळी प्रेक्षकांसाठी खास असणार आहे. या दिवाळीमध्ये एक, दोन नव्हे तर तब्बल पाच चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. या पाच चित्रपटांमध्ये दोन मराठी चित्रपटांचाही समावेश आहे. त्यामुळे यंदा तिकीटबारीवर पाच चित्रपटांची चढाओढ लागणार असल्याचं दिसून येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड खिलाडी अभिनेता अक्षय कुमारच्या आगामी ‘हाऊसफुल ४’ या चित्रपटाची चर्चा आहे. हा चित्रपट २६ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमारसोबतच रितेश देशमुख, क्रिती सनॉन, बॉबी देओल, पूजा हेगडे आणि क्रिती खरबंदा अशी कलाकारांची फौज यामध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजीने केले आहे.

अभिनेत्री मौनी रॉय आणि राजकुमार यांची मुख्य भूमिका असलेला ‘मेड इन चायना’ हा चित्रपट २५ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये मौनी रॉयने राजकुमार रावच्या पत्नीची मुख्य साकारली आहे. तर बोमण इराणीने डॉ. वर्धी या सेक्सोलॉजिस्टची व्यक्तीरेखा वठविली आहे. यांच्या व्यतिरिक्त या चित्रपटामध्ये परेश रावल, अमायरा दस्तूर, सुमीत जोशी, मनोज व्यास हे कलाकारही मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

तापसी पन्नू आणि भूमि पेडणेकर यांची मुख्य भूमिका असेलला ‘सांड की आँख’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून जगातील सर्वांत वृद्ध महिला शार्पशूटर्स यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. यामध्ये तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर शूटर दादींची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट २५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

हिंदी चित्रपटांप्रमाणेच दोन मराठी चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोनाली कुलकर्णी हिची मुख्य भूमिका असलेला ‘हिरकणी’ हा चित्रपट २४ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर शिवानी सुर्वे, अंकुश चौधरी आणि पल्लवी पाटील यांची मुख्य भूमिका असलेला ‘ट्रिपल सीट’ हा चित्रपट २५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे एकंदरीतच काय तर यंदाची दिवाळी प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची असणार आहे.