गेल्या दोन वर्षांमध्ये चरित्रपटांनी बॉलीवूडमध्ये चांगलाच जोर धरला आहे. ऑलिम्पिकपटू मेरी कोम असेल, मिल्खा सिंग यांच्यासारखी मोठी नावे असतील किंवा लोकांना फारसा माहीत नसलेला चंबळ खोऱ्यातला आधी देशासाठी लढणारा सैनिक आणि नंतर दरोडेखोर म्हणून शिक्का बसलेला बंडखोर पानसिंग तोमरसारखी व्यक्ती असेल, त्यांच्या जीवनावर बेतलेल्या चित्रपटांनी चांगले यश मिळवले आहे. या चित्रपटांना मिळालेली प्रेक्षकपसंती आणि त्याचे तिकीटबारीवर झालेल्या कमाईतील रूपांतर पाहून चरित्रपट हा बॉलीवूडसाठी यशाचा नवा फॉम्र्युला ठरला आहे. याही वर्षी नऊ चरित्रपटांच्या निर्मितीचा घाट घातला गेला आहे.
‘मेरी कोम’, ‘शाहीद’, ‘भाग मिल्खा भाग’सारख्या चित्रपटांना मिळालेल्या यशानंतर चरित्रपटांची एकच लाट बॉलीवूडमध्ये आली आहे. त्याची परिणिती म्हणून यावर्षी किमान नऊ चरित्रपटांची घोषणा झाली आहे. काहींचे चित्रीकरणही सुरू झाले आहे, तर काही चरित्रपट पोस्ट प्रॉडक्शनच्या प्रक्रियेत आहेत. दिग्दर्शक अनंत महादेवन यांचा तिसरा चरित्रपट ‘गौर हरी दास्तान’ प्रदर्शनासाठी सज्ज आहे. देशासाठी लढलेल्या गौर हरी दास यांना देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण स्वातंत्र्यसैनिक आहोत हे सिद्ध करण्यासाठी अवघे आयुष्य खर्ची घालावे लागले. त्यांची दास्तान या चित्रपटातून पाहायला मिळेल. आयुष्यभर डोंगर फोडून रस्ता बनवणाऱ्या बिहारच्या दशरथ मांझींवरचा ‘माऊंटन मॅन’ हाही चित्रपट यावर्षी प्रदर्शित होईल. याशिवाय, महेंद्रसिंग धोणी याच्या आयुष्यावरचा ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, माजी कॅप्टन अझरुद्दीन याची वादग्रस्त कारकीर्द टिपणारा ‘अझर’ या चरित्रपटांची यावर्षी सर्वात जास्त चर्चा आहे.

चरित्रपटांचा उल्लेख होतो तेव्हा बऱ्याचदा हयात नसलेल्या कर्तबगार व्यक्तींच्या आयुष्याची कर्तृत्वगाथा सांगणारा चित्रपट असे काहीसे ठोकताळे असायचे. मात्र तसा भेदभाव बॉलीवूडजनांना मानवणारा नाही. त्यामुळेच धोणी आणि अझरुद्दीनसारख्या खेळाडूंवर चित्रपट बनवले जात आहेत. लोकांच्या गळ्यातला ताईत असलेल्या, त्यांच्या नजरेसमोर असलेल्या धोणीसारख्या व्यक्तीची भूमिका साकारणे फार अवघड आहे. लोक थेट तुलना करतात. पण, रांचीच्या गल्लीत क्रिकेट खेळणारा धोणी नावाचा एक तरुण भारतीय क्रिकेट संघाच्या कॅ प्टनपदापर्यंत कसा पोहोचला? याची लोकांना उत्सुकता असते, असे मत धोणीची भूमिका करणाऱ्या सुशांतसिंग राजपूतने व्यक्त केले. अझरुद्दीनची भूमिका करणाऱ्या इम्रान हाश्मीच्या मते अझरची कारकीर्द, त्याचे वाद या गोष्टी लोकांना माहिती असल्या तरी त्याची संपूर्ण कथा पडद्यावर पाहणे प्रेक्षकांसाठी रंजकच ठरते. त्यामुळेच ‘अझर’सारख्या चित्रपटांना मागणी आहे, असे तो म्हणतो.

घोषित झालेले चरित्रपट

’ नीरजा भानोत – विमान अपहरणानंतर आपला जीव धोक्यात घालून प्रवाशांना वाचवणाऱ्या हवाईसुंदरी नीरजा भानोतची कथा

’ दंगल – पैलवान महावीर फोगट यांच्यावरचा चित्रपट, आमीर खान मुख्य भूमिकेत

’ फुटबॉलपटू मोहन बगान यांच्यावरचा ‘१९११’ हा चित्रपट, जॉन अब्राहमची मुख्य भूमिका

’ अलिगढ – समलिंगी असल्याच्या भीतिपायी एका अलिगढ विद्यापीठात शिकवणाऱ्या डॉ. श्रीनिवास रामचंद्र सिरास या प्राध्यापकाला निलंबित करण्यात आले, त्याची वास्तव कहाणी. मनोज वाजपेयी प्राध्यापकाच्या भूमिकेत

’ १९६२च्या भारत-चीन युद्धात शहीद झालेल्या रायफलमॅन जसवंतसिंग रावत यांची कथा सांगणारा चित्रपट

चरित्रपट प्रेरणादायी वाटतो

कर्तबगार व्यक्तींच्या आयुष्यातला संघर्ष हा लोकांना नेहमीच प्रेरणादायी वाटतो. मात्र, कधी कधी सामान्य माणसांमधलाच एखादा जेव्हा असामान्य कर्तृत्व करून दाखवतो, तेव्हा त्याच्या आयुष्यातले नाटय़ प्रेक्षकांना जास्त भावते. असे चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांना एक नवी ऊर्जा मिळते आणि म्हणूनच, फारशी माहिती नसलेल्या अशा असामान्य व्यक्तींवरील चरित्रपट सध्या यशस्वी ठरत आहेत.    अनंत महादेवन