News Flash

‘थोडं तुझं, थोडं माझं’: मनोकायिक चकवा

संजय नार्वेकर यांनी श्रीकांतचं मनोकायिक रूप अचूक टिपलं आहे

(संग्रहित छायाचित्र)

रवींद्र पाथरे

श्रीकांत बाल्कनीत व्हीलचेअरवर पाठमोऱ्या बसलेल्या सरिताशी भरभरून बोलतोय. आपल्या सत्काराबद्दल तिला सांगतोय. तिलाही न्यायचं त्याच्या मनात होतं, परंतु तिच्या या अशा अवस्थेमुळे तिला सत्कार समारंभाला नेणं कसं शक्य नव्हतं हेही तो तिला उत्साहाने सांगतोय. पण तरीही ती काहीच बोलत नाही. आपल्यावर ती रागावलीय असं वाटून तो तिची समजूत काढायचाही प्रयत्न करतो. परंतु एक नाही न् दोन नाही. ती काहीच बोलायला राजी नाही. त्याचं बडबडणं जणू हवेत विरून जातंय. तिच्या त्या अबोल्याने हळूहळू त्याचा उत्साह विझत जातो.

एवढय़ात घरातली मोलकरीण सुमन येते. तिला क्षणभर कळतच नाही, की हे नेमकं काय चाललंय? सरिता गेली वीस वर्षे ‘लॉक्ड इन् सिंड्रोम’मुळे व्हीलचेअरला खिळून आहे. रेल्वेतून पडल्याने तिच्या मेंदूला मार बसून तिच्या शारीरिक व मानसिक संवेदना गोठल्यात. ती बोलू शकत नाही. व्यक्त होऊ शकत नाही. हालचाल करू शकत नाही. जणू एक जिवंत प्रेत घरात आहे. निव्वळ श्वास घेतेय म्हणूनच तिला जिवंत म्हणायचं. अन्यथा तिच्या असण्याला काहीअर्थ उरलेला नाही.

लग्नाच्या सहाव्याच दिवशी ती दोघं बाहेर फिरायला जात असताना अचानक ती लोकलमधून खाली पडली आणि त्या दिवसापासूनच तिची ही अवस्था झालीय. तेव्हापासून श्रीकांत तिची मनोभावे सेवा करतोय. एक ना एक दिवस ती या अवस्थेतून बाहेर पडेल, तिला वास्तवाचं भान येईल असा त्याला ठाम विश्वास आहे. त्यामुळेच तो तिचं सारे काही करत आलाय. तिला न्हाऊ घालणं, तिचे कपडे बदलणं, जेवण-चहा-नाश्ता भरवणं, नटवणं, तिच्याशी गप्पा मारणं, तिला फिरायला घेऊन जाणं. त्याचं बोलणं, हसणं, थट्टामस्करी, गप्पा या कशालाच खरं तर ती प्रतिसाद देत नाही. तरीही त्याला तिच्या मनातलं सारं काही कळतंय. निदान त्याचा तसा समज आहे. गेली वीस वर्षे हे सुरू आहे. अलीकडे तर तो कॉलेजमधूनही तिच्याशी फोनवर तासन् तास बोलत असतो. त्याच्या फोन बिलाने सरितावर उपचार करणारे श्रीकांतचे डॉक्टर मित्र बुचकळ्यात पडतात. त्यांना आधी वाटतं की श्रीकांत दुसऱ्या एखाद्या मुलीच्या प्रेमात पडला आहे की काय? पण चौकशीअंती एक धक्कादायक गोष्ट त्यांना कळते : श्रीकांत सरितालाच फोन लावत असतो आणि तिच्याशी गप्पा मारत असतो. याचा अर्थ श्रीकांतचं वास्तवाचं भान सुटत चाललंय. तो मनोरुग्ण होऊ घातलाय. डॉक्टर त्याला त्याच्या या मनोवस्थेची जाणीव करून देतात व वेळीच या भासातून बाहेर पड म्हणून सांगतात. मात्र, श्रीकांतचं म्हणणं.. ‘मी मनोरुग्ण नाही. मला याचं पुरेपूर भान आहे की सरिता माझ्याशी बोलत नाहीए, तर मीच स्वत: तिच्याशी ठरवून बोलतोय. तिच्यावरील या मन:पूत श्रद्धेतूनच ती एके दिवशी नक्की बरी होईल आणि आम्ही दोघं नॉर्मल वैवाहिक आयुष्य जगू शकू.’ आता यावर डॉक्टर काय बोलणार?

असंच एके दिवशी श्रीकांत सरिताला घरातल्या घरात व्हीलचेअरवरून फिरवत असताना ती घाबरून किंचाळते.. ‘नो..नो..’!

..आणि चमत्कार होतो! ती खरोखरच वास्तवात येते. तिला भोवतालचं भान येतं. परंतु भानावर आल्यावर ती श्रीकांतचा कमलीचा तिरस्कार करू लागते. आपण सरिता नसून अदिती (तिचं माहेरचं नाव) आहोत असं तिचं म्हणणं असतं. तिला त्याच्याशी झालेलं आपलं लग्न मान्य नसतं. त्याने आपला गेली वीस वर्षे जो शारीरिक व मानसिक छळ केला त्याबद्दल ती त्याला झडझडून जाब विचारते. आपल्या या अवस्थेला श्रीकांतच कारणीभूत असल्याचा बेफाट आरोप ती करते.

श्रीकांतला समजत नाही, की ती अशी का वागतेय? आपण इतकी वर्षे तिची मनापासून सेवाशुश्रुषा करूनही तिने असं का वागावं? तो खोदून खोदून तिला विचारतो तेव्हा ती त्याला जे घडलं ते स्वच्छपणे सांगून टाकते. ते काय, हे प्रत्यक्ष नाटकात पाहणंच उचित ठरेल.

लेखक अभिजीत गुरू यांनी ‘थोडं तुझं, थोडं माझं’ नाटकात लॉक्ड इन् सिंड्रोममध्ये अडकलेल्या एका स्त्रीची गोष्ट सांगतानाच मानसिकदृष्टय़ा तशीच अवस्था झालेल्या दुसऱ्या रुग्णाचीही केस एक प्रकारे मांडली आहे. त्यातही पती-पत्नीमधील नात्याची टोकाची दोन उदाहरणं समोरासमोर ठेवून लग्नसंस्थेबाबतही त्यांनी काहीएक भाष्य केलं आहे. अपघातात शारीरिक व मानसिकदृष्टय़ा सर्वस्वी अपंग झालेल्या सरिताची मनोभावे सेवा करणाऱ्या श्रीकांतला ती भानावर आल्यावर झिडकारते. परंतु त्यांच्या घरची मोलकरीण सुमन हिला तिचा दारूडा नवरा रोज मारझोड करत असूनही ती त्याला सोडत नाही. सरिताचं लग्न होण्यापूर्वी अभय नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते, हे समजल्यावर श्रीकांत त्याचा पत्ता शोधून काढतो आणि तिला देतो. ‘माझ्यावर तुझं प्रेम नाही, तेव्हा ज्याच्यावर तुझं प्रेम आहे त्या अभयकडे तू जा.. मी तुला अडवणार नाही,’ असं तो तिला सांगतो. त्यावेळी ती त्याला जे काही सुनावते त्याने तो हादरून जातो. श्रीकांतचे डॉक्टर मित्र तिला श्रीकांतच्या मनोकायिक आजाराबद्दल सांगतात. तेव्हा सरिताला जाणीव होते- की त्याला या अवस्थेत सोडून जाणं योग्य नाही. ती परत येते. आपल्यातलं पती-पत्नीचं नातं आता संपलेलं आहे, मग कोणत्या नात्यानं आपण आता एकत्र राहायचं, असा प्रश्न श्रीकांतला पडतो. श्रीकांत-सरिताच्या नात्यातील हा पेच नाटकात अधोरेखित करण्यात आला आहे. स्त्री-पुरुष संबंधांतील तिढे यानिमित्तानं ऐरणीवर आणायचा प्रयत्न यात लेखकाने केला आहे. मात्र, हा गुंता नको इतका ताणला गेल्याने त्यातलं वेगळेपण उणावलं आहे. संहितेचं योग्य प्रकारे संपादन केल्यास हा दोष काढून टाकता येणं शक्य आहे. चार पात्रांचं हे नाटक असलं तरी त्यातली दोनच पात्रं मुख्य असल्याने संहितेतील पेच धारदार असणं गरजेचं होतं. तसे ते आहेतही. परंतु सरिता भानावर आल्यावर पुढचा घटनाक्रम एवढा ताणण्याची आवश्यकता नव्हती. त्यातही सुमनवर विरंगुळ्याची जबाबदारी दिली गेली आहे. नाटय़ांतर्गत ताणाचा निचरा त्यातून होतो. संहितेत काही कच्चे दुवे आहेत. अदिती (सरिता) वडलांच्या इच्छेखातर बोहोल्यावर उभी राहते यात तिचाही दोष नाही का? अभयने अदितीची त्यानंतर कधीच चौकशी का केली नाही? श्रीकांतने आपण केलेल्या चुकीची इतकी भयंकर शिक्षा भोगल्यानंतर व त्याबद्दल मनापासून माफी मागितल्यावरही त्याच्याप्रती सरिताचं वर्तन किंचित सहानुभूतीपूर्ण असायला काय हरकत होती? अशा प्रकारच्या विचित्र तिढय़ात सापडलेली जोडपी पुन्हा आयुष्यभर एकमेकांसोबत सहजीवन व्यतीत करू शकतात? की त्यात तडजोड असते? ..असे अनेक प्रश्न नाटक पाहताना पडतात.

दिग्दर्शक स्वप्नील बारस्कर यांनी प्रयोगातली नाटय़पूर्णता जपली आहे. यातला मनोविश्लेषणपर भाग तरल राखणं गरजेचं होतं. त्याने प्रयोगाची उंची वाढली असती. नाटकातील काही अनावश्यक तपशिलांची काटछाट करून नाटय़परिणाम गडद करता येण्याजोगा आहे. डॉक्टरांनी सरिताला श्रीकांतच्या असीम त्यागाबद्दल सांगून  टिपिकल नवरा-बायको नात्याची जाणीव करून दिल्याने नाटकात ढोबळपणा आला आहे. तो टाळायला हवा होता. त्या दोघांच्या संबंधांतील अंधारी गुहा आणि तिने घडवलेली उलथापालथ हा या नाटकाच्या गाभ्याचा विषय आहे. तसाच तो असायला हवा. असो.

संदेश बेंद्रे यांनी श्रीकांतच्या घराचं साकारलेलं नेपथ्य आर्थिक-सामाजिक स्थितीची जाणीव करून देणारं आहे. तसंच ते नाटकाची मागणीही पुरवतं. अभिजीत पेंढारकरांनी पाश्र्वसंगीतातून तणावपूर्ण घटना-प्रसंग ठळक केले आहेत. प्रकाशयोजनाकार भूषण देसाई यांची त्यांना साथ लाभली आहे. विजय भाईगडे (वेशभूषा) व संदीप नगरकर (रंगभूषा) यांनी पात्रांचे सामाजिक स्थान निर्देशित केले आहे.

संजय नार्वेकर यांनी श्रीकांतचं मनोकायिक रूप अचूक टिपलं आहे. व्हीलचेअरला खिळून असलेल्या पत्नीची मन:पूर्वक सेवा करणारा, तिच्याशी सतत संवाद करणारा, तिच्या अशक्यकोटीतील आजारातून तिला जिद्दीनं बाहेर काढू पाहणारा पती आणि गुरूच्या सुंदर कन्येबद्दल वाटलेल्या आकर्षणापायी नको ती चूक करून बसल्याची खंत जन्मभर उराशी बाळगून त्याची किंमत मोजणारा श्रीकांत त्यांनी भावदर्शीपणे साकारला आहे. त्यासाठी त्यांना आपल्या उपजत अभिनयाला काहीशी मुरड घालावी लागली आहे. ‘बिच्चारेपण’ त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आहेच.  त्याचा त्यांनी छान उपयोग करून घेतला आहे. समिधा गुरू यांची सरिता आणि अदिती ही दोन रूपं पूर्णपणे वेगळ्या धाटणीची आहेत. एक पतिपरायण, प्रेमळ स्त्री (सरिता); तर दुसरी प्रेमभंगाने आणि लॉक्ड इन् सिंड्रोमच्या विळख्यात वीस वर्षे आयुष्य गोठून गेल्यानंतर वास्तवात आलेली स्त्री (अदिती)! समिधा गुरू यांनी ही स्थित्यंतरं मुद्राभिनय, वावर, संवादभाषा यांतून नेमकेपणानं पोहोचवली आहेत. वनिता खरात यांची कामवाली सुमन अस्सल अन् लोभस. डॉक्टरच्या भूमिकेत प्रसाद आठल्ये आहेत.

वेगळ्या विषयावरचं, विचारप्रवण करणारं ‘थोडं तुझं, थोडं माझं’ एकदा तरी पाहायला हरकत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2019 4:12 am

Web Title: thoda tuza thoda maza marthi drama abn 97
Next Stories
1 आयुष्यावर गप्पा!
2 वेबवाला : पुन्हा तेच तेच.. 
3 ‘नाटक  माझे पहिले प्रेम’
Just Now!
X