अलिगढ मुस्लिम विद्यापीठात पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जिन्ना यांचं चित्र लावणं खूप लाजिरवाणं असून विरोध करणाऱ्यांनी नथुराम गोडसेच्या सन्मानार्थ बांधल्या जाणाऱ्या मंदिरांचाही विरोध केला पाहिजे असं गीतकार जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे. अलिगढ मुस्लिम विद्यापीठात जिन्ना यांचं चित्र लावण्यात आलं असल्या कारणाने मोठा वाद निर्माण झाला असून, जावेद अख्तर यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपलं मत मांडलं आहे. अलीगढचे भाजपा खासदार सतीश गौतम यांनी चित्र हटवण्याची मागणी केल्यानंतर या वादाला सुरुवात झाली होती.

‘मोहम्मद अली जिन्ना अलीगढ विद्यापीठाचे ना विद्यार्थी होते, ना शिक्षक. त्यांचं चित्र तेथे लावणं ही खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे. प्रसाशन आणि विद्यार्थ्यांनी ते चित्र तेथून हटवलं पाहिजे. आणि जे या चित्राला विरोध करत आहेत त्यांनी नथुराम गोडसेच्या सन्मानार्थ बांधल्या जात असलेल्या मंदिरांनाही विरोध केला पाहिजे’, असं जावेद अख्तर यांनी ट्विटरवर लिहिलं आहे.

दरम्यान विद्यापीठात जिनांचा फोटो १९३८ पासून म्हणजे भारताच्या फाळणी अगोदरपासून लावलेले आहे. संसदेकडून जर जिनांचे छायाचित्र हटवण्याबाबत काही सूचना आली तर त्याचे पालन केले जाईल असे विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष फैजल हसन याने म्हटलं आहे. विद्यापीठाचे प्रवक्ते शफी किडवाई यांनीही जिना यांच्या चित्राचे समर्थन केलं आहे. जिन्ना हे विद्यापीठाचे आजीवन सदस्य होते आणि युनिव्हर्सिटी कोर्टाचेही सदस्य होते. गेली अनेक दशके हे चित्र तेथे आहे. त्याला आजवर कोणी आक्षेप घेतला नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

कॅम्पसमध्ये घोषणा देत घुसखोरी करणाऱ्या आंदोलकांना अटक व्हावी अशी मागणी करणाऱ्या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर बुधवारी पोलिसांनी कारवाई केली. यावेली सहा विद्यार्थी जखमीदेखील झाले. हे आंदोलनकर्ते हिंदू युवा वाहिनीचे होते. पोलिसांनी कोणतीही कारवाई न करता त्यांना सोडून दिले असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.