तुम्ही जर तुमचे विकेण्ड हे झॉम्बींचा हल्ला, पृथ्वीचा अंत, एलियन्सचा हल्ला, जगाचा विनाश यासारख्या विषयांवरील चित्रपट पाहण्यामध्ये घालवत असाल तर सर्वात आधी तुमचे अभिनंदन. कारण नुसत्याच समोर आलेल्या एका संशोधनानुसार असे चित्रपट पाहणारे लोकं हे इतर लोकांपेक्षा महामारी म्हणजेच साथीच्या रोगाच्या काळाचा जास्त सक्षमपणे सामना करु शकतात. या संशोधनासंदर्भातील वृत्त द गार्डीयनने दिलं आहे.

कॉन्टॅजियन, अ क्वाइट प्लेस, बर्ड बॉक्स यासारखे चित्रपट पाहणाऱ्यांना सध्याच्या परिस्थितीचा सामना कसा करावा हे अधिक चांगल्या प्रकारे जमत असल्याचे या संशोधनामध्ये म्हटलं आहे. असे चित्रपट पाहणाऱ्यांना सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण गोष्टी कशा हाताळल्या पाहिजेत हे अधिक योग्य प्रकारे ठरवता येते असंही संशोधनामध्ये नमूद केलं आहे.

“तुम्ही एखादाच चांगला चित्रपट पाहत असाल तर तुम्ही त्या चित्रपटातील भूमिकांप्रमाणे विचार करु लागता. त्यामुळे तुम्ही इच्छा नसतानाही, नकळत त्या परिस्थितीमधून जाता,” असं मानसोपचारतज्ज्ञ असणारे कोल्टेन स्कॅरिव्हेनर सांगतात. कोल्टेन हे शिकागो विद्यापिठामध्ये एखाद्या गोष्टीची आवड असल्याने त्यासंदर्भात निर्माण होणाऱ्या उत्सुकता आणि त्याचे मानसिक परिणाम या विषयांवर काम करतात. “लोकं विचित्रपणे अनेक गोष्टी शिकत असतात. उदाहरण द्यायचं झालं तर टॉयलेट पेपर संपल्यावर काय खरेदी केलं पाहिजे हे अनेकांना ठाऊक असतं,” कोल्टेन सांगतात. अमेरिकेमध्ये मध्यंतरी करोना लॉकडाउनच्या कालावधीमध्ये टॉयलेट पेपरचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर टिश्यू पेपरची मागणी वाढली होती असं कोल्टेन यांना सूचित करायचं होतं.  या उदाहरणामधून परिस्थितीनुसार माणूस शिकतो याकडे ते लक्ष वेधतात.

या संशोधनामध्ये ३१० जणांना प्रश्न विचारण्यात आले. या लोकांना आधी चित्रपटांच्या आवडीनिवडीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. त्यानंतर त्यांना या साथीच्या कालावधीमध्ये तुम्ही कशापद्धतीने जगत आहात याबद्दल विचारण्यात आले. त्यामधून त्यांच्यामध्ये असणारी अस्वस्थता, मानसिक ताण, चिडचीड, झोप न लागणे यासारख्या मुद्द्यांच्या आधारे संशोधकांनी निष्कर्ष काढले.

भयपट पाहण्याची आवड असणारे लोकं हे अधिक शांत वाटले. मात्र जगाचा विनाश, पृथ्वीवरील हल्ल्यांसंदर्भातील चित्रपट पाहणारे लोकं हे शारीरिक तसेच मानसिक दृष्ट्या अधिक सक्षम असल्याचे दिसून आलं.