‘थ्री बीलबोर्ड आउटसाइड एबिंग, मिझुरी’सारखा चित्रपट भारतीय भूमीत घडला असता (तसा प्रभाव घेऊन तो पुढे येणार नाही याची हमी देता येत नाही) तर इथल्या साऱ्याच तथाकथित परफेक्शनिस्टांनी त्याच्या पटकथेमध्ये प्रेक्षकधाíजण्या भाव-भावनांचा, राग-क्रोधाचा ओतप्रोत मसाला भरला असता. म्हणजे आपल्या मुलीवर झालेल्या क्रूर घटनेबाबतचा सततचा दृश्यमारा आठवणारी नायिका दिसली असती. कोणत्याही परिस्थितीमध्ये गुन्ह्य़ाची उकल करून दाखविणरा ‘सत्यमेव जयते’ या ब्रीदवाक्याची उकल करणारा पोलीस अधिकारी दिसला असता. प्रेक्षकांच्या डोळ्यात हासू-आसूची आवर्तने उमटवणारा पाश्र्वसंगीताचा पाठलाग कायम राहिला असता. थोडक्यात काय, तर मनोरंजनाची शंभर टक्के खात्री देणारी सुस्पष्ट गोष्ट सांगणारा एक हीट चित्रपट तयार झाला असता. त्यानंतर त्या चित्रपटातील नायिकेचा किंवा परफेक्शनिस्ट कलाकाराचा तिकीटबारीवरील कमाईचा नवा विक्रमही झाला असता. पण ‘थ्री बीलबोर्ड आउटसाइड एबिंग, मिझुरी’ हा सुदैवाने बॉलीवूडमध्ये बनलेला नाही. त्यामुळे त्याची गोष्ट असाधारण निवेदनाची पातळी गाठणारे प्रयोग राबविते. त्याची नायिका खरेखुरे परफेक्शनिस्ट असण्याची व्याख्या मांडते. त्याचा एकूण परिणाम आजवर पाहिलेल्या सूड-गुन्हेपटांहून अधिककाळ डोक्यावर गोंदला जातो. लघुकथा, कादंबरी असो किंवा एखादा चित्रपट, त्याची प्रमुख लक्षणे ही स्पष्टीकरणीय सुरुवात आणि शेवटावर अवलंबून असते. ‘थ्री बीलबोर्ड आउटसाइड एबिंग, मिझुरी’ हा नियम न पाळता प्रेक्षकाला ,सुरुवाती-शेवटाच्या मधल्या गोष्टीमध्ये खिळवून ठेवण्याची क्षमता राखते.

मार्टिन मेकडोना या दिग्दर्शकाला आणि फ्रान्सिस मॅकडरमण्ड या अभिनित्रीला यंदाच्या ऑस्कर प्रांगणात मिरविण्याची पुरेपूर मुभा या चित्रपटाने दिली आहे. गुन्हेकथापटाचा आजवर न दिसलेला चित्रपटीय आविष्कार येथे सर्वागाने पाहायला मिळतो. अमेरिकेतील एका छोटय़ाशा शहरगावातील घटनेने प्रभावित झालेल्या व्यक्तींशी संबंधित ही गोष्ट आहे. मिझुरी प्रांतातील एबिंग भागामध्ये उभारण्यात आलेल्या तीन मोठाल्या फलकांपासून सुरू होणारी. त्या फलकांवर योजलेला मजकूर आक्षेपार्ह नसला, तरी त्या शहरगावाला ढवळून काढण्यास पुरेसा असतो.

चित्रपटाला सुरुवात होते ती शहरात प्रवेश करणाऱ्या मोक्याच्या जागेत असलेल्या तीन रिक्त फलकांपाशी गाडी उभी करणाऱ्या नायिका मिल्ड्रेड हेज (मॅकडरमण्ड) हिच्या डोक्यात त्या तिन्ही फलकांची जागा भाडय़ाने घेण्यापासून. पुढच्या क्षणाला मिल्ड्रेड जाहिरात कंपनीच्या कार्यालयात दाखल होते आणि त्या रिक्त फलकांवर इनमीन तीन ओळींचा मजकूर प्रकाशित करते. आपल्या बलात्कार करून ठार मारण्यात आलेल्या मुलीचा गुन्हेगार न पकडल्याबद्दल त्या फलकावर शहराच्या मुख्य पोलीस अधिकाऱ्याला जाब विचारलेलेला असतो. ही फलक उभारणी प्रत्यक्ष गुन्ह्य़ाविषयीचे कणभरही दृश्य न दाखविता घटनेचे गांभीर्य लक्षात आणून देते. स्थानिक वृत्तवाहिन्या या फलकांच्या प्रयोजनाबाबत मिल्ड्रेडला सहानुभूती दाखवितात. पण सहानुभूतीची शून्य गरज असलेली मिल्ड्रेड राग-क्रोधाच्या टोकाच्या पातळीवर पोहोचली असल्याने आख्ख्या पोलीस यंत्रणेला गुन्हे उकलीचे आव्हान देते.

गुन्ह्य़ाचा कोणताही पुरावा शिल्लक नसल्याने पोलीस यंत्रणा महिनोन्महिने हवेत तीर मारून या घटनेचा तपास बंद करण्याच्या पातळीवर पोहोचलेली असते. करारी पोलीस प्रमुख विलबी (वुडी हेरलसन) ज्याच्या नावाने फलकावर जाब विचारला जातो, तो  गुन्हेगाराला पकडता येत नसल्याने लवकरच आत्महत्येचा मार्ग पत्करतो. त्याच्या उलट स्वभाव असलेला घाशीराम धाटणीचा पोलीस अधिकारी डिक्सन (सॅम रॉकवेल) फलक उभारणीपासूनच मिल्ड्रेडवर दडपशाही राबवू पाहतो. जाहिरात कंपनीपासून वाटेत येणाऱ्या साऱ्या गोष्टींवर हिंसात्मक कारवाई करणाऱ्या या वंशद्वेष्टी पोलीस अधिकाऱ्याने कडव्या व्यक्तीची भूमिका सुरेख साकारली आहे. तो खलनायक नाही, मात्र त्याची भाषा आणि दडपशाही अंगावर येणारी आहे.

फ्रान्सिस मॅकडरमण्ड या अभिनेत्रीने साकारलेली कणखर मिल्ड्रेड पाहणे हा इथला सोहळा आहे. आपल्या मुलीसोबत फ्लॅशबॅकमधल्या एकाच संवादात रांगडय़ा भाषेत वावरणारी. पोलीस अधिकाऱ्यांना थेट चौकीत जाऊन खुन्नस देणारी आणि आपल्या फलकांना जाळल्याचा न्यायनिवाडा म्हणून आख्खी पोलीस चौकीच आगीत फुंकून नामानिराळी राहणारी मिल्ड्रेड यंदाच्या ऑस्करसाठीच्या सवरेत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराची थेट दावेदार आहे. सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे या चित्रपटांतील साऱ्याच गोष्टी नियमाबरहुकूम चालत नाहीत. इथे अतितिरकस विनोद असला, तरी चित्रपट प्रचंड गंभीर आहे. गुन्ह्य़ाची उकल, सत्याचा विजय, गुन्हेगाराचा चेहरा असल्या पारंपरिक गोष्टींना इथे महत्त्व नाही. विशिष्ट काळात छोटय़ाशा शहरामध्ये घडत जाणाऱ्या घटनांची ही मालिका आहे. फलकांच्या रूपकातून ती मालिका राग-द्वेष, सूडाच्या विविध पातळ्या दाखविते. पटकथा, दिग्दर्शन, अभिनय आणि वेस्टर्नबाजाचं संगीत आदी इथले सगळेच घटक चित्रपटाला अविस्मरणीयतेची वैशिष्टय़े पुरवितात. चाकोरीतला विषय चाकोरीबाह्य़ पद्धतीने कसा मांडावा, याचे या वर्षांतले सर्वात चांगले उदाहरण दाखवून देणारा हा चित्रपट आहे.