यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात आमिर खानचा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच आमिर आणि अमिताभ बच्चन एकत्र आले. अर्थातच जेव्हा बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आणि बॉलिवूडचा महानायक एकत्र येतात, तेव्हा प्रेक्षकांना चित्रपटाकडून भरपूर अपेक्षा असतात. ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’चा पोस्टर, टीझर, ट्रेलर आणि गाणी पाहता चित्रपटांमध्ये खूप उत्सुकता होती. व्हीएफएक्स, मोठमोठ्या कलाकारांची वर्णी, तगडी स्टारकास्ट, भरपूर खर्च असं  एवढं सगळं पॅकेज असताना चित्रपट प्रेक्षकांना वैसा वसूल मनोरंजन देईल अशी अपेक्षा होती. पण आमिरने प्रेक्षकांची निराशा केली आहे.

गुरुवारी ८ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. पहिला शो संपल्यानंतर सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. चित्रपट व्यापार विश्लेषक आणि समीक्षक तरण आदर्शने ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ला अवघे दोन स्टार दिले आहेत. ‘प्रत्येक चकाकणारी गोष्ट सोनं नसते,’ अशा शब्दांत त्याने चित्रपटाचं वर्णन केलं आहे. कथानक, दिग्दर्शन या बाबतीत हा चित्रपट पूर्णपणे फसल्याचं त्याने ट्विटमध्ये म्हटलं आहे.  आमिर आणि अमिताभ स्क्रिन शेअर करत असूनही कथानक आणि दिग्दर्शनाच्या बाबतीत हा चित्रपट कमी पडतो अशी प्रतिक्रिया काही प्रेक्षकांनी दिली. एकंदरीत सोशल मीडियावर नकारात्मक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आता बॉक्स ऑफीसवर हा चित्रपट किती कमाई करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा चित्रपट फिलिप मेडोस टेलर यांच्या ‘कन्फेशन्स ऑफ अ ठग अँड द कल्ट ऑफ द ठगी’ या कादंबरीवर आधारित आहे. यामध्ये आमिर, अमिताभ यांच्यासोबतच फातिमा सना शेख आणि कतरिना कैफ यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन विजय कृष्ण आचार्य यांनी केलं आहे.