‘सैराट’ नंतर नागराज मंजूळे हिंदीत चित्रपट करणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यांच्या पहिल्या हिंदी चित्रपटात अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार असल्याने साहजिकच या चित्रपटाचे चित्रिकरण कधी सुरू होणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. आता या चित्रपटाची घोषणा खुद्द अमिताभ यांनीच केली असून फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस ते नागराजच्या ‘झुंड’ या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू करतील, असा अंदाज आहे.

नागराज मंजूळे यांचे दिग्दर्शक म्हणून हिंदीतील पदार्पण आणि पदार्पणातच अमिताभ बच्चनसारख्या सुपरस्टारबरोबर काम अशी मराठीजनांसाठी अभिमानाची बाब ठरलेली ही गोष्ट प्रत्यक्षात होऊ घातली आहे. सध्या अमिताभ हे यशराज बॅनरच्या ठग्ज ऑफ हिंदुस्थान या चित्रपटाचे चित्रिकरण करत आहेत. अमिताभ आणि आमिर खान असे दोन मोठे कलाकार या चित्रपटात एकत्र येणार असून धूम फेम दिग्दर्शक विजय कृष्ण आचार्यने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. कतरिना कैफ आणि दंगल चित्रपटामुळे प्रसिध्द झालेली अभिनेत्री फातिमा सना शेख या दोघी चित्रपटाच्या नायिका आहेत. या चित्रपटाचे चित्रिकरण अजूनही सुरूच असून फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत ते संपेल, अशी माहिती अमिताभ यांनी समाजमाध्यमांवरून दिली आहे. सध्या दिवसरात्र या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू आहे. ठग्ज ऑफ हिंदुस्थानचे चित्रिकरण संपल्यानंतर अमिताभ नागराज मंजूळे यांच्या झुंडचे चित्रिकरण सुरू करतील, अशी चर्चा असल्याने कधी एकदा त्या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण होते, यावर इंडस्ट्रीच्या नजराही रोखलेल्या आहेत यात शंका नाही. अमिताभ यांनी झुंडचा उल्लेख केलेला नाही मात्र फेब्रुवारीत ठग्ज ऑफ हिंदुस्थानचे चित्रिकरण संपल्यानंतर आपण पुढच्या चित्रपटाकडे वळणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांचा पुढचा चित्रपट सध्या तरी नागराजचाच चित्रपट असल्याने हिंदी आणि मराठीची ही अनोखी झुंड लवकरच सुरू होणार आहे.