सलमान खान, शाहरूख खान, आमिर खान, अजय देवगण या मंडळींनी चित्रपटनिर्मितीची समीकरणेच आजघडीला बदलून टाकली आहेत. त्यांची लोकप्रियता मोठी त्यामुळे त्यांच्या जोरावर चित्रपट वितरण-विपणन खांद्यावर घेणाऱ्यांचं गणितही बळकट होत चाललं आहे. शंभर, दोनशे, पाचशे कोटींपेक्षाही जास्त व्यवसाय करणाऱ्या या कलाकारांचे चित्रपट जेव्हा बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटतात तेव्हा ही तोटय़ाची जबाबदारी कोणी घ्यायची, हा प्रश्न उरतोच. मात्र या मंडळींनी ती जबाबदारी स्वीकारत वितरकांना तोटा होऊ नये याची पुरेपूर काळजी घेत चित्रपट व्यवसायात एक नवीन पायंडा घालून दिला आहे. यशराज फिल्म्सने आमिर खान आणि अमिताभ बच्चन या मोठ्या कलाकारांसोबत ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’सारखा भव्य- दिव्य चित्रपट केला आणि तो तितक्याच भव्य-दिव्यतेने आपटला. त्यामुळे आता थिएटर मालक आमिरकडे नुकसान भरपाईची मागणी करणार असल्याचं समजतंय.

आमिरचा चित्रपट म्हणून देशभरातील चित्रपटगृहांमध्ये चार- चार शोज लावणाऱ्या वितरकांचे धाबे दणाणले. ‘बॉलिवूड हंगामा’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’च्या अपयशाने थिएटर मालक निराश आहेत. मोठ्या कलाकारांची वर्णी असलेल्या या चित्रपटामुळे दिवाळीत चांगली कमाई होईल अशी त्यांची अपेक्षा होती. पण त्याच्या उलट चित्र समोर आलं. चित्रपटाच्या निर्मितीवर जवळपास ३०० कोटी रुपयांचा खर्च झाला असून गेल्या दहा दिवसांत चित्रपटाची बॉक्स ऑफीस कमाई फक्त १४३ कोटी रुपये इतकीच झाली आहे. त्यामुळे थिएटर मालक आमिरकडे नुकसान भरपाईची मागणी करणार आहेत.

कोणाला झाला फायदा?

‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’मुळे जरी थिएटर मालकांना नुकसान सहन करावा लागला असला तरी ‘यश राज फिल्म्स’च्या उपवितरकांना मात्र फायदा झाला आहे. यामागचं कारण म्हणजे ‘यश राज फिल्म्स’च्या नियमांनुसार ठराविक टक्केवारीवर चित्रपटाचं वितरण होतं. या बॅनर अंतर्गत वितरित होणाऱ्या प्रत्येक चित्रपटावर एक ठराविक टक्केवारी उप- वितरकांना मिळते. ही टक्केवारी साधारणपणे दहा ते बारा टक्क्यांदरम्यान असते.

याआधी बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खानचा ‘दिलवाले’ हा चित्रपट जेव्हा बॉक्स ऑफीसवर आपटला तेव्हा शाहरूखने वितरकांचे झालेले नुकसान भरून देण्यासाठी काहीएक रक्कम देण्याचे ठरवले होते. सलमानने मात्र आपल्या स्वभावाप्रमाणेच खुल्या दिलाने ‘टय़ुबलाईट’चा तोटा वितरकांना सहन करावा लागू नये म्हणून ५५ कोटी रुपये परत करण्याचा निर्णय घेतला होता.