बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची भूमिका असेलला ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित होत आहे. या वर्षीचा सर्वांत मोठा चित्रपट अशी चर्चा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ची आहे. गेल्या आठवड्यापासून या चित्रपटातील एक एक कलाकारांच्या भूमिकांवरून पडदा उठत आहे. अमिताभ, फातिमा, कतरिना यांच्या भूमिकांवरून पडदा उठल्यानंतर मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर कोणती भूमिका साकारतो याचं कुतूहल अनेकांना होतं.

तेव्हा यशराज फिल्मनं या आता आमिरच्या लूकवरूनही पडदा उठवला आहे. आमिर या चित्रपटात ‘फिरंगी’च्या भूमिकेत आहे. आमिरचा हा लूक ‘पायरेट्स ऑफ कॅरेबिअयन’मधल्या जॅक स्पॅरोच्या जवळ जाणारा आहे. त्यामुळे ठग्स ‘पायरेट्स ऑफ कॅरेबिअयन’चं देसी व्हर्जन आहे की काय अशा चर्चा रंगत आहे. पण, हा चित्रपट फिलिप टेलरच्या ‘कन्फेशन्स ऑफ अ ठग्स’ या कांदबरीवर आधारलेला आहे. २७ सप्टेंबरला या चित्रपटाचा पाहिला ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. तर ८ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.