एखाद्या नाटकावरून बेतलेला चित्रपट पाहताना त्यातील नाटय़ रुपेरी पडद्यावर उतरण्याऐवजी चार भिंतींआडचा प्रयोग सेल्युलॉइडवर उतरवलेला पाहिला की त्याचा प्रभाव कमी होतो. गोविंद निहलानींचे दिग्दर्शन असलेला ‘ती आणि इतर’ हा चित्रपट पाहताना ती मर्यादा कायम जाणवत राहते. ‘लाइट्स आऊट’ या मंजुला पद्मनाभन यांच्या नाटकावरून घेतलेला हा चित्रपट त्यातील विचारामुळे खूप महत्त्वाचा ठरतो. निहलानींचे दिग्दर्शन असल्याने त्यांना या कथेच्या माध्यमातून प्रेक्षकांना जे सांगायचे होते तो विचार त्यांनी अचूकपणे पोहोचवला आहे. मात्र चित्रपटापेक्षा ते नाटकच पडद्यावर पाहत असल्याची भावना मनात घर करून राहते.

Yanda Kartavya Aahe fame smita shewale what does do now
‘यंदा कर्तव्य आहे’ सिनेमाला १८ वर्षे पूर्ण! या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री सध्या काय करते? जाणून घ्या
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

गोविंद निहलानी यांच्या चित्रपटांची स्वत:ची अशी एक शैली आहे, त्यातही ती वास्तववादी चित्रपटाची शैली असल्याने ‘ती आणि इतर’ या चित्रपटात ती जास्त ठळकपणे जाणवते. अनिरुद्ध आणि नैना गोडबोले (सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णी) या दाम्पत्याच्या घरात घडणारी ही कथा आहे. कुठल्याशा अनामिक भीतीची छाया नैनावर आणि पर्यायाने तिच्या घरातील इतर माणसांवर आहे याची जाणीव आपल्याला पहिल्या काही मिनिटांतच होते. नैना गायिका आहे आणि तिच्या पहिल्या गझल अल्बमचे प्रकाशन झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी या दोघांनीही आपल्या मित्रमंडळींना घरी बोलावले आहे. अनिरुद्ध आणि नैनाच्या दोन मुली आणि त्यांच्या घरात काम करणारी रिंकू असे पाच जण या घरात राहत आहेत. कुठल्या तरी किंकाळीसारख्या आवाजाचे दडपण नैनाच्या मनावर आहे. सुरुवातीला ते फक्त तिच्याच मनावर आहे असे वाटते, पण नंतर रिंकूच्या आणि अनिरुद्धच्या मनावर हे दडपण असल्याचे लक्षात येते. तरीही आनंद साजरा करण्याच्या नावाखाली हे तिघेही मनातली ती गोष्ट बाजूला सारतात. चित्रपटातील नाटय़ कायम राखण्यासाठी केवळ संवादातून दिग्दर्शकाने ही गोष्ट पुढे नेली आहे. अनिरुद्ध आणि नैनाबरोबर पार्टीत नैनाचा भाऊ मोहन (अविष्कार दारव्हेकर), तिची मैत्रीण जानकी (अमृता सुभाष) जी पत्रकार आहे, त्यांचा मित्र भास्कर (भूषण प्रधान) आणि त्याची बायको माधवी (प्रिया मराठे) ही सगळी मंडळी सहभागी होतात. आणि एका क्षणाला तो आवाज त्यांनाही ऐकू येतो.

सुरुवातीला आवाजाचे हे रहस्य दडपण्याचा अनिरुद्धचा प्रयत्न ते जानकीच्या आग्रहामुळे एका क्षणाला त्या आवाजामागची कथा समोर आल्यानंतर चित्रपट वेगळे वळण घेतो.  दुसरे म्हणजे या चर्चेच्या निमित्ताने प्रत्येकाचा मूळ स्वभाव उलगडत जातो आणि तो त्यानुसार खरा व्यक्त होतो. हे होत असताना चित्रपटातील सगळ्या ‘ती’ व्यक्तिरेखा एकीकडे आणि पुरुषांची मानसिकता दुसरीकडे हा फरक दिग्दर्शकाने ठळकपणे दाखवून दिला आहे. अन्याय्य, अयोग्य ते समजते पण त्याच्याबद्दल नेमकी काय पावले उचलायची? हा गोंधळ बुद्धीवादी किंवा तथाकथित पांढरपेशा समाजात पाहायला मिळतो किंवा अशा घटनांमध्ये त्यांच्या व्यक्त होण्याच्या पद्धतीवरून त्यांना आक्रमक किंवा मध्यमवर्गीय, पांढरपेशे अशी लेबल्स चिकटवली जातात. प्रत्यक्षात ठोस पावले उचलताना त्याचे परिणाम लक्षात घेऊनच त्यावर सावध भूमिका घेणे ही खरे तर सहज प्रवृत्ती आहे. मात्र आपल्यावरचा अन्याय संपवायचा असेल, निदान आपल्या मनातले द्वंद्व संपवायचे तरी काहीएक भूमिका घ्यावीच लागते. ती भूमिका काय असावी? याबद्दल दिग्दर्शक कुठेही भाष्य करत नाही. पण मानवी मनातले वैचारिक युद्ध निहलानींनी अचूक पद्धतीने रंगवले आहे. त्यांना सुबोध, सोनाली, अमृता या तिघांनीही भक्कम साथ दिली आहे. पण चित्रपटात नको त्या ठिकाणी क्रोमाचा वापर, नाटकाप्रमाणे ठरावीक अँगलने केलेले चित्रीकरण अशा काही गोष्टींमुळे चित्रपटातील नाटक असे चित्र पाहणाऱ्याच्या मनात तयार होते. पण एक वेगळा आणि वैचारिक चित्रपट म्हणून ‘ती आणि इतर’चे स्थान महत्त्वाचे आहे.

चित्रपट : ती आणि इतर

  • दिग्दर्शन- गोविंद निहलानी
  • कलाकार- सोनाली कुलकर्णी, सुबोध भावे, अमृता सुभाष, सुमन पटेल, भूषण प्रधान, प्रिया मराठे, अविष्कार दारव्हेकर, गणेश यादव.