डोक्याला लाल पट्टी बांधून बासरीवर धून वाजवणारा ‘हीरो’ जॅकी श्रॉफ आणि त्याची ती लोकप्रिय धून अजूनही लोकांच्या स्मरणात आहे. जॅकी श्रॉफचा हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला तो या ‘हीरो’ चित्रपटाने.. आता त्याचा मुलगा टायगर श्रॉफही हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करतो आहे. योगायोगाने त्याच्या चित्रपटाच्या नावातही ‘हीरो’ आहे. त्यामुळे या नव्या हीरोच्या प्रवेशासाठी त्याच्या वडिलांच्या चित्रपटातली तीच लोकप्रिय धून वापरण्याचा निर्णय निर्माता साजिद नाडियादवाला यांनी घेतला आहे.
टायगर श्रॉफचा बॉलीवूड प्रवेश दणक्यात व्हावा, यासाठी निर्मात्यांसह जॅकी श्रॉफचीही धडपड सुरू आहे. पण ज्या ‘हीरो’ चित्रपटातून जॅकीचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला त्याच चित्रपटाची लोकप्रिय धून टायगरच्या ‘हिरोपंती’साठी वापरावी, ही कल्पना त्यांनाही सुचली नव्हती. मात्र दिग्दर्शक साबीर खानला ही कल्पना सुचली. त्याने निर्माता साजिद नाडियादवालापर्यंत पोहोचवली.
तेव्हा वडील आणि मुलगा या दोघांचेही पदार्पणातले चित्रपट या एका धूनमध्ये गुंफले जावेत याच्यापेक्षा चांगली गोष्ट असू शकत नाही, असे मत साजिद यांनी व्यक्त केले. पण ही कल्पना प्रत्यक्षात येईल की नाही, याबद्दल चित्रपटाची टीम साशंक होती.
सुभाष घई दिग्दर्शित ‘हीरो’ चित्रपटाच्या गाण्यांचे सगळे हक्क ‘सा रे ग म’कडे होते. आम्हाला चित्रपटातील पूर्ण गाणे नको होते. केवळ बासरीवर वाजवलेली ती धून हवी होती. कुठलीही आडकाठी न घेता ‘सा रे ग म’कडून आम्हाला या धूनचे स्वामित्वहक्क विकत घेता आले, अशी माहिती साबीर खान यांनी दिली. ही धून ‘हिरोपंती’ चित्रपटातील गाण्यात वापरण्यात येणार आहे. ‘हीरो’ चित्रपट १९८३ साली प्रदर्शित झाला होता.
तेव्हाची गाणी ही सगळी हळुवार, मधुर संगीत असणारी होती. ‘हिरोपंती’ हा पूर्णत: आजच्या पिढीचा चित्रपट आहे. दोन चित्रपटांमध्ये जवळजवळ तीस वर्षांचे अंतर आहे. त्यामुळे ही धून वापरताना आजच्या काळाला साजेसे असे संगीत घेऊन येणार आहे, असेही साबीर खान यांनी सांगितले.
ज्या गाण्यात ही धून वापरण्यात येणार आहे ते उडत्या चालीचे गाणे असल्यामुळे धूनही तशाच प्रकारची असेल, असे त्यांनी सांगितले. ही धूनची गंमत अजून जॅकी श्रॉफ यांच्यापर्यंत पोहोचलेली नसल्याने त्यांची यावर काय प्रतिक्रिया उमटेल, याची पूर्ण टीमला उत्सुकता आहे.