‘नागरिकत्व दुरुस्ती कायदा २०१९’ लागू झाल्यापासून देशभरात निदर्शने सुरू झाली आहे. ईशान्य भारतानंतर राजधानी दिल्लीसह अनेक ठिकाणी आंदोलक रस्त्यांवर उतरले आहेत. दरम्यान ‘जामिया मिलिया इस्लामिया’ विद्यापीठातील काही विद्यार्थांनी ‘नागरिकत्व दुरुस्ती कायदा’ मुस्लिम विरोधी आहे, असे म्हणत आंदोलन केले होते. आंदोलन करणाऱ्या या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या प्रकारावर प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर याने संताप व्यक्त करत ट्विट केले आहे. “फक्त सोशल मीडियावरुन विरोध करण्याची वेळ आता संपली आहे.”

काय म्हणाला फरहान अख्तर ?

“ही आंदोलन का महत्वाची आहेत हे तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. १९ ऑगस्ट रोजी मुंबईतील क्रांती मैदानात भेटू. फक्त सोशल मीडियावरुन विरोध करण्याची वेळ आता संपली आहे.” अशा आशयाचे ट्विट फरहानने केले. तसेच त्याने या क्रार्यक्रमाबाबत माहिती देणारे एक माहितीपत्रक देखील पोस्ट केले आहे. या ट्विटव्दारे त्याने प्रत्यक्ष मैदानात उतरुन आंदोलन करण्याचे आवाहन लोकांना केले आहे.

यापूर्वी सिद्धार्थ, अनुभव सिन्हा, विकी कौशल, पूजा भट्ट, आलिया भट्ट, परिणीती चोप्रा, रेणूका शहाणे, जावेद जाफरी, हूमा खुरेशी, स्वरा भास्कर यांसारख्या अनेक चित्रपट कलाकारांनी ट्विट करुन जामिया हिंसाचार प्रकरणावर संताप व्यक्त केला होता.