‘नया है वह’, ‘आरे हम गरीब हुए तो क्या हुए दिल से आमीर है आमीर’, ‘आई बाबा आनि साईबाबाची शप्पथ….’ हे संवाद माहित नसतील असा एखादाच मराठी प्रेक्षक असेल. २०१४ सालच्या टाईमपास या चित्रपटाला लोकांची चांगलीच पसंती मिळाली. रवी जाधव दिग्दर्शित आणि दगडू अर्थात प्रथमेश परब, वैभव मांगले, केतकी माटेगावकर, भाऊ कदम, मेघना एरंडे यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट. यातले संवाद, गाणी आजही प्रेक्षकांच्या कानामनात आहेत. आता या चित्रपटाचा तिसरा भाग लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते.
‘टाईमपास’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या पुढच्याच वर्षी याचा दुसरा भागही प्रदर्शित करण्यात आला. यात मोठेपणीच्या दगडूच्या प्रमुख भूमिकेत प्रियदर्शन जाधव तर प्राजक्ताच्या भूमिकेत अभिनेत्री प्रिया बापट होती. याही चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
View this post on Instagram
आता या चित्रपटाचा तिसरा भागही येणार असं दिसतंय. लवकरच या भागाचं शुटींग सुरु होणार असल्याचं दिग्दर्शक रवी जाधवनं आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर केलंय. अभिनेत्री हृता दुर्गुळेनेही आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीत एक फोटो शेअर केलाय, ज्यात टाईमपासच्या दगडूचा एक प्रसिद्ध डायलॉग आहे, “आईबाबा आणि साईबाबाशप्पथ.”
या तिसऱ्या टाईमपासमध्ये हृता दुर्गुळे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे का, हा चित्रपट कधी पाहायला मिळेल, कथा या सगळ्याबद्दल प्रेक्षकांच्यात उत्सुकता असणारच. पण सध्या तरी या सगळ्या बाबी गुलदस्त्यातच आहेत. पण पुन्हा एकदा दगडूचं “आईबाबा आणि साईबाबाशप्पथ…….” ऐकायला मिळणार हे मात्र नक्की.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 15, 2021 12:46 pm