२५ मार्चपासून सायंकाळी ६.३० वाजता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर सुरु होणाऱ्या ‘मोलकरीण बाई’ या मालिकेच्या प्रोमोजनी सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. प्रोमोप्रमाणेच या मालिकेचं शीर्षकगीतही काळजाला भिडणारं आहे. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचं संगीत, लेखिका रोहिणी निनावे यांचे शब्द आणि ऊर्मिला धनगरच्या आवाजात या गाण्याचं रेकॉर्डिंग करण्यात आलंय.

अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांसोबतच घरकाम करणारी बाई ही नोकरदार स्त्रियांच्या आयुष्यातली महत्त्वाची व्यक्ती आहे. जिच्या असण्याने आयुष्य जितकं सुखकर होतं तितकंच तिच्या नसण्याने अस्ताव्यस्त. कुटुंबातली सदस्य नसली तरी ती कुटुंबातलाच एक अविभाज्य भाग असते. आपल्या आयुष्यातल्या याच महत्त्वाच्या व्यक्तीची गोष्ट सांगणारी ‘मोलकरीण बाई’ ही मालिका लवकरच ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. घरकाम करणाऱ्या स्त्रियांचं भावविश्व मालिकेच्या शीर्षकगीतातून रेखाटण्यात आलंय.

crime
आमदार गीता जैन यांच्या संस्थेतील प्रकार; छायाचित्रे चोरून संचालिकेला ब्लॅकमेल, तिघांवर गुन्हा दाखल
The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
Kiran Rao First Time Speaks About Divorce With Amir Khan
किरण रावने पहिल्यांदाच सांगितली आमिर खानसह घटस्फोट घेतानाची मनस्थिती; म्हणाली, “लग्नसंस्थेचे नियम..”

‘मोलकरीण बाई’ या मालिकेच्या शीर्षकगीताविषयी सांगताना ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की म्हणाले, ‘प्रत्येकाला आपलंसं वाटेल असं हे शीर्षकगीत आहे. दिस रात पदरात, जरी कष्टाचं आंदण… दाराशी बांधलं तिनं, स्वप्नांचं तोरण… हे शब्दच खूप बोलके आहेत. ममता आणि गावरान ठसका याचा उत्तम मिलाफ या शीर्षकगीताचं वेगळेपण म्हणता येईल.

रोहिणी निनावेंनी हे शीर्षकगीत लिहिलं आहे. मालिकेची कथा आणि पात्रांचं मनोगत शीर्षकगीतातून मांडण्याचा प्रयत्न केला असल्याचं त्यांनी सांगितलं. कष्ट करणाऱ्या स्त्रियांविषयीची ही मालिका आहे. दु:खातही सुख शोधण्याची त्यांची सकारात्मक वृत्ती ‘मोलकरीण बाई’ या मालिकेतून मांडण्यात येणार आहे. प्रेक्षकांना हे शीर्षकगीत आणि मालिका नक्की आवडेल अशी भावना रोहिणी निनावे यांनी व्यक्त केली.

ऊर्मिला धनगरच्या आवाजात हे गाणं स्वरबद्ध झालंय. सुंदर शब्द आणि सुरेख चाल असल्यामुळे हे गाणं गाताना खुपच मजा आली. माझ्यासाठी हे शीर्षकगीत खुपच स्पेशल असल्याचं ऊर्मिला म्हणाली.

उषा नाडकर्णी, भार्गवी चिरमुले, सारिका निलाटकर, सुप्रिया पाठारे, अश्विनी कासार आणि गायत्री सोहम या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने नेहमीच प्रेक्षकांच्या आवडी-निवडीचा विचार करत वैविध्यपूर्ण मालिका सादर केल्या आहेत. ‘मोलकरीण बाई’ ही मालिकादेखील अश्याच एका अनोख्या जगाची सफर प्रेक्षकांना घडवेल.