अभिनेता मनोज वाजपेयी यांच्या ‘द फॅमिली मॅन’ च्या पहिल्या भागाच्या यशानंतर मेकर्सनी याच वेब सीरिजचा दुसरा पार्ट भेटीला आणला आहे. या सीरिजच्या सिक्वेलची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक सीरिजची खूप दिवसांपासून प्रतिक्षा करत होते. या सीरिजचा ट्रेलर आज प्रदर्शित करण्यात आलाय. या ट्रेलर सीरिजच्या फॅन्सनी मोठ्या प्रमाणात पसंती दिलीय. तर दुसरीकडे सीरिज कायद्याच्या कचाट्यात अडकताना दिसून येत आहे.

राज्यसभा खासदार वायको यांनी या वेब सीरिजवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना थेट पत्रच लिहिलंय. याआधीही एनटीकेचे संस्थापक सीमन यांनी देखील बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यापाठोपाठ आता स्वत: तामिळनाडू सरकारने केंद्र सरकारला अधिकृतपणे पत्र लिहून या वेब सीरिजवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

या वेब सीरिजमध्ये ईलम तमिळला अत्यंत चुकीच्या पद्धतीने सादर केल्याचा आरोप या पत्रामध्ये करण्यात आलाय. तसंच आज प्रदर्शित करण्यात आलेल्या ट्रेलरमध्ये श्रीलंकेतील ऐतिहासिक संघर्षात सामील असलेल्या ईलाम तमिळांची विश्वासार्हता संपवण्याचं आणि त्यासंबंधातील तथ्य चुकीच्या पद्धतीने सादर केलं असल्याचं देखील या पत्रात म्हटलं आहे. या सीरिजमध्ये तमिळ बांधवांच्या भावनांना ठेस पोहोचवल्याचं कारण देत तमिळनाडू सरकारनं ही वेब सीरिज केवळ तमिळनाडू नाहीतर संपूर्ण देशात प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.

या ट्रेलरमध्ये तमिळीयन्सना एक आतंकवादी आणि आईएसआई एजंटच्या रूपात दाखवण्यात आलंय. त्यांचं कनेक्शन थेट पाकिस्तानसोबत जोडण्यात आल्याचं सांगितलं आहे. या सीरिजमधून साउथची सुपरस्टार सामंथा अक्किनेनी हिंदी इंडस्ट्रीमध्ये डेब्यू करणार आहे.

‘द फॅमेली मॅन 2’ ही सीरिज १२ फेब्रुवारी २०२१ रोजी अॅमेझॉन प्राइमवर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार होती. पण करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आता ही सीरिज ४ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजच्या माध्यमातून दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे. मनोज वाजपेयी आणि समंथासोबत प्रियामणि, शारिब हाशमी, सीमा बिस्वा, दर्शन कुमार, शरद केळकर, सनी हिंदुजा, श्रेया धन्वंतरी, शहाब अली, वेदांत सिन्हा आणि महक ठाकूर हे कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.