हिंदी चित्रपटउद्योगाला बॉलीवूड म्हणू नये अशी मागणी भाजपाच्या नेत्यांनी केली आहे. हिंदी चित्रपट सृष्टीला बॉलीवूड हे नाव बीबीसीने दिले आहे. केवळ हॉलीवूडची नक्कल करणारे ते बॉलीवूड अशा उपहासात्मक दृष्टीनं हे नाव दिलं असल्यामुळे ते वापरू नये अशी मागणी भाजपाचे महासचिव कैलाश विजयवर्गिया यांनी केली आहे. या संदर्भात ते माहिती व प्रसारण खात्याला पत्रही लिहिणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
“काही दिवसांपूर्वी चित्रपट निर्माते सुभाष घई आमच्या मुख्यालयात आले होते. त्यांनी सांगितले की बीबीसीने हे नाव आपल्या चित्रपट क्षेत्राला दिले आहे. हॉलीवूडची नक्कल आपण करतो अशा आशयानं हा शब्द वापरण्यात आला होता. आपल्या उद्योगाची खिल्ला उडवण्यासाठी हा शब्द निर्माण झाला असल्यामुळे तो वापरणं ताबडतोब थांबवलं पाहिजे,” विजयवर्गिया यांनी सांगितले.

विजयवर्गिया यांनी सुभाष घई यांच्या #DontCallItBollywood य सोशल मीडियावरील कँपेनमध्ये सहभागही घेतला आहे. माहिती व प्रसारण खात्याशी या संदर्भात आपण सविस्तर चर्चा करणार असून खात्यानं हस्तक्षेप करायला हवा अशी आपली इच्छा असल्याचे ते म्हणाले. “दादासाहेब फाळके व सत्यजीत रे यांच्यासारखे थोर चित्रपट निर्माते आपल्याकडे होऊन गेले. आपण अनेक सुंदर सिनेमे बनवले आहेत. असं असताना आपण फक्त हॉलीवूडची नक्कल करतो असं कसं म्हणता येईल,” असा प्रश्नही विजयवर्गियांनी विचारला आहे. भारतीय चित्रपट सृष्टीचं महत्त्व सांगताना भाजपा नेत्याने फिक्की या संस्थेच्या अहवालातील आकड्यांचा दाखला दिला आहे. भारतीय चित्रपट सृष्टीने १६५ अब्ज रुपयांचा व्यवसाय वर्षाला केला आहे. भारतात २४ भाषांमध्ये चित्रपट बनतात. दंगलसारख्या सिनेमानं तर १६०० कोटी रुपयांचा व बाहुबलीनं २००० कोटी रुपयांचा व्यवसाय केल्याचा दाखला विजयवर्गिया यांनी दिला आहे.

एनडीए सरकारनं पहिल्या कालखंडात भारतीय चित्रपट क्षेत्राला उद्योगाचा दर्जा दिला होता. यामुळे वित्तपुरवठा सुरळित व्हायला मदत झाली होती. आता बॉलीवूड नावाचा कलंक जायला हवा असे ते म्हणाले. आपल्या इथल्या फिल्म क्षेत्राला हिदी फिल्म इंडस्ट्री, तामिळ फिल्म इंडस्ट्री असं संबोधणं मानाचं आहे असं त्यांनी म्हटलं आहे. या गुलामी मानसिकतेतून बाहेर येण्यासाठी प्रसारमाध्यमांनीही पुढाकार घ्यायला हवा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.