30 September 2020

News Flash

अंधारवारी!

चित्रपट सुरू होतो तो कॅनडामधील दुर्गम भागातील एका जनरल स्टोअरमधल्या अतिगडद वातावरणात.

चित्रपट ‘द डार्क

पंकज भोसले

भूत किंवा भयपटांच्या प्र्रेक्षकाच्या अंगावर अमानवी शक्ती दर्शनातून काटा आणण्याच्या क्लृप्त्या गेल्या काही दशकांत निष्प्रभ होत चालल्या आहेत. अतिक्रूर झॉम्बी, विद्रूपोत्तम राक्षस आणि रक्तशोषक व्हॅम्पायर्सचे पडद्यावरचे क्रौर्य गमतीशीर मनोरंजनासारखी पाहण्याइतपत दृश्यिक निबरता सर्वच प्रगत आणि प्रगतीशील समाजाकडे आली आहे. वास्तव आयुष्यात घडणाऱ्या हिंसा, शोषण, हत्या आणि दुर्घटनांचे प्रमाण इतके वाढलेले आहे की, पडद्यावरील मनोकल्पित भय त्यापुढे कमी ठरावे.

भय सिनेमांच्या पटलावर आक्राळ-विक्राळ संगीत, ओंगळवाणी भुतं यांचा आधार घेत पारंपरिक भूतपटांद्वारे प्रेक्षकांना नेहमीच्या भयपर्यटनास नेणारे चित्रकर्ते जगभरात मुबलक आहेतच. पण भयपटांच्या पारंपरिक साच्यामध्ये बदल करून प्रेक्षकांना चकवत ठेवणारे मूठभर दिग्दर्शकही आहेत. अन् त्यांच्यामुळे या चित्रप्रकारामध्ये नेहमीच घुसळण झालेली दिसते. उदाहरणच घ्यायचे झाले, तर डॅनी बॉयलच्या ‘ट्वेंटीएट डेज लेटर’ (२००२) या चित्रपटानंतर झॉम्बी सिनेमांमध्ये प्रचंड प्रयोग झाले. पुढल्या दशकात  ‘शॉन ऑफ द डेड’, ‘फायडो’, ‘स्नो डेड’सह कित्येक लक्षात राहतील असे झॉम्बी चित्रपट आले.  ‘ट्वायलाईट’ या आधुनिक व्हॅम्पायर प्रेमकथा मालिकेनंतर या चित्रप्रकाराशी खेळणारे दिग्दर्शक पुढे आले. ‘लेट द राईट वन इन’ नावाच्या स्विडिश चित्रपटात लहानग्या व्हॅम्पायरची एका छोटय़ाशा मुलासोबतची मैत्रीकथा रंगविण्यात आली होती. व्हॅम्पायर सिनेमा असूनही यातील भीतीपातळी शून्यासमान होती, तरी चित्रपट भयप्रेमींचे समाधान करण्यात यशस्वी झाला होता. यंदा आलेला ‘द डार्क’ हा सिनेमा ‘लेट द राईट वन इन’ या भयपटाच्या जातकुळीतला आहे. त्यात लहान मुलेही आहेत अन् भीती जागाही, पण पारंपरिक भयसमीकरणांचा कमी वापर आहे.

चित्रपट सुरू होतो तो कॅनडामधील दुर्गम भागातील एका जनरल स्टोअरमधल्या अतिगडद वातावरणात. तेथे दाखल होऊन भांबावलेल्या अवस्थेत खरेदी करणाऱ्या मध्यमवयीन व्यक्तीपासून. जात्याच तुच्छतावादी भासणारा दुकानचालक या भांबावलेल्या ग्राहकाला तो जाऊ इच्छिणाऱ्या ‘डेव्हिल्स डेन’ या भीषण परिसराविषयी आणि तेथील अतिमानवी शक्तीविषयी पुणेरी थाटात माहिती देत असतो. त्याच वेळी दुकानातील टीव्हीवर सुरू असलेल्या बातम्यांमध्ये क्रूर आणि विकृत गुन्हेगाराची सचित्र माहिती झळकते. हा चेहरा भांबावलेल्या ग्राहकाशी मिळताजुळता असल्याचे समजल्यानंतर आता भांबावण्याची वेळ तुच्छतावादी दुकानदारावर येते, पण ती पूर्ण होण्याआधीच ग्राहक आपल्या बंदुकीचा सढळहस्ते वापर करून मोकळा होतो.

आता दुकानातील भांबावलेल्या अवस्थेचे आवरण काढून ही क्रूरसदृश व्यक्ती आपल्या गाडीतून डेव्हिल्स डेन या कुप्रसिद्ध जागी येऊन धडकते. तेथे एका भग्न वाडय़ात शिरतो. निवाऱ्याचा विचार करीत असतानाच त्याला वाडय़ात कुणीतरी आपल्या हालचालींवर लक्ष ठेवत असल्याचे लक्षात येते. थोडय़ाच वेळात आपल्यावर जीवघेणा हल्ला सुरू झाल्याचे त्याच्या लक्षात येते आणि उंदीर-मांजराचा खेळ तब्बल सात ते आठ मिनिटे गडद आणि किर्र जंगलातून सुरू राहतो.

हा खेळ संपल्यानंतर आपल्याला चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखेची ओळख होते, जिची अमानुष रक्तपीपासा पाहिल्यानंतर ती अमानवीय शक्ती असल्याचीच खात्री होते. विचित्र रूपातील मध्यमवयीन तरुणीसमान वाटणारी ही मुख्य व्यक्तिरेखा डेव्हिल्स डेनवर राज्य करणारी मॉन्स्टर असते. रक्तपानाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर ती गाडीची चाचपणी करते, तेव्हा त्यात अपहरण करून डांबून ठेवलेल्या तरुण मुलाचा शोध तिला लागतो. अत्यंत क्रूरपणे डोळे काढून आणि अत्याचार करून गाडीत लपविण्यात आलेल्या या मुलाची ती सुटका करते. अंध असलेला हा तरुण न भेदरता तिच्याशी संवाद साधतो. अन् या संवाद मैत्रीतूनच मॉन्स्टर अवस्थेत गेलेल्या एका अत्याचारित मुलीचे मानवीकरण होण्याची प्रक्रिया भय-थराराचे पुरेपूर अंश घेऊन सुरू होते.

जस्टिन पी लॅन्ग या दिग्दर्शकाच्या ‘द डार्क’ला याच नावाच्या त्याच्या शॉर्टफिल्मचा आधार आहे. मोठय़ा आकारात हा चित्रपट करताना त्याने जगातील समाजात सुरू असलेल्या शोषण, अत्याचारांच्या आणि गुन्हेगारांच्या विकृतीने पोळल्या गेलेल्या लहान मुलांच्या कथांना जोडले आहे. अपहरण झालेल्या अंध मुलाशी ओळखीनंतर डेव्हिल्स डेनमध्ये मानवी रक्त पिऊन जगणाऱ्या मॉन्स्टरचे पूर्वायुष्य मीना (नादिया अलेक्झांडर) नावाने चित्रपटात फ्लॅशबॅक आणि कमबॅकसह समोर येते. अ‍ॅलेक्स (टोबी निकोलस) हा अंध तरुण तिला कायम आपल्याजवळ राहण्याचा आग्रह धरतो. मुलाला शोधून आणण्यासाठी लागलेल्या बक्षिसाच्या आमिषाने डेव्हिल्स डेनमध्ये शिरकाव करणाऱ्या धूर्त लोकांचा मीना आपल्यापरीने नायनाट करत जाते. पण अ‍ॅलेक्सशी अल्पकाळाच्या सहवासात तिच्या जगण्यात बदल घडू लागतो. चित्रपटाचे ‘द डार्क’ हे नाव चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखांच्या आयुष्यावर पडलेल्या अंधाराशी एकरूप झालेले आहे. इथले गडद वातावरण, अल्प तरी प्रभावी संभाषण आणि दिग्दर्शनासह अचूक अभिनय यांच्यासाठी बिलकूल न घाबरवणारी ही अंधारवारी चुकवू नये अशी आहे. ‘तुंबाड’नंतर भयसिनेमांबाबत आपल्याकडे सध्या होत असलेल्या चांगल्या वातावरणात तर आवर्जूनच.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2018 2:59 am

Web Title: toby nichols and nadia alexander in the dark
Next Stories
1 ‘नव्या विचारांच्या मालिका याव्यात’
2 ‘कुत्ते कि दुम’ चित्रपटाची गाणी प्रदर्शित
3 Video : ‘गोमू संगतीनं’ रिक्रिएट करण्यात नवीन जोडी यशस्वी
Just Now!
X