राज्य मराठी विकास संस्था आयोजित राज्यस्तरीय आंतर महाविद्यलयीन नाटय़ाविष्कार स्पर्धा ‘रंगवैखरी’चा नाटय़ जल्लोष राज्यभर सुरू आहे.  रविवारी ६ जानेवारीला मुंबईत प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़ मंदिर येथे स्पर्धेची महाअंतिम फेरी रंगणार आहे. सकाळी १० वाजल्यापासून स्पर्धेला सुरुवात होणार असून प्रेक्षकांना विनामूल्य प्रवेश आहे.

कवी – ज्ञानेश्वर, तुकाराम, मोरोपंत, केशवसुत, बा. सी. मर्ढेकर, नामदेव ढसाळ, आरती प्रभू, अरुण कोलटकर. कादंबरीकार ह. ना. आपटे, र. वा. दिघे, श्री. ना. पेंडसे, अण्णाभाऊ  साठे, व्यंकटेश माडगूळकर, भाऊ  पाध्ये, कमल देसाई, भालचंद्र नेमाडे, श्याम मनोहर यांच्यापैकी कोणत्याही एका कवीच्या कवितांवर किंवा कादंबरीकाराच्या कादंबरीवर आधारित नवीन नाटय़संहिता विद्यार्थ्यांनी लिहून – दिग्दर्शित करून, तिचे संगीत, नृत्य, चित्र, शिल्प यांसह ४० मिनिटांचे नाटय़ाविष्काराचे सादरीकरण विद्यार्थ्यांना करायचे होते.

या स्पर्धेत न्यू आर्टस् अ‍ॅंड कॉमर्स कॉलेज, अहमदनगरची प्रमोद कसबे लिखित-दिग्दर्शित ‘वैजंयता’, श्री.स.ह.केळकर महाविद्यालय, देवगडची ऋत्विक धुरी लिखित अपेक्षा सकपाळ दिग्दर्शित ‘फुगडी’, शिवाजी कला महाविद्यालय, अमरावतीची सचिन गोटे लिखित दीपक नादंगावकर दिग्दर्शित ‘मनकल्लोळ’, रामनारायण रुईया महाविद्यालय, मुंबईची स्वागत मेदगे लिखित जयेश वाव्हळ दिग्दर्शित ‘द्रोणायन’, फग्र्युसन महाविद्यालय, पुणे यांची किशोर गरड लिखित किशोर गरड व मयूर सरकाळे दिग्दर्शित ‘वारसदार’, गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरीची प्रसन्न खानविलकर लिखित श्रेया जोशी दिग्दर्शित ‘अधिक देखणे तरी’, बी. वाय. के. महाविद्यालय, नाशिकची प्रिया जैन लिखित, कृतार्थ कंसारा दिग्दर्शित ‘तुकाराम डाऊ नलोडिंग’ आणि ज्योती कॉलेज, बेळगावची प्रणाली पेडणेकर लिखित, संकेत लोहार दिग्दर्शित ‘द्रोण’ हे वेगळा विषय आशय मांडणारे आणि विभागीय अंतिम फेरी विजेते नाटय़ाविष्कार महाअंतिम फेरीत सादर होणार आहेत. महाअंतिम फेरीच्या विनामूल्य प्रवेशिका नाटय़गृहावर एक तास आधी उपलब्ध असतील.