अक्षय कुमारचा ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ हा त्याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत १३३.६० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. दिग्दर्शक श्री नारायण सिंग यांनी फेसबुकवर ही माहिती दिली. ‘जॉली एलएलबी २’नंतर अक्षयच्या या चित्रपटाने १०० कोटींचा आकडा पार केला आहे. शिवाय या दोन्ही चित्रपटांची प्रेक्षक आणि समीक्षकांनी भरभरुन स्तुती केली. गेल्या काही आठवड्यांपासून अनेक हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटत असताना बॉलिवूडचा ‘खिलाडी’ मात्र यंदाच्या वर्षी भाग्यवान ठरला असंच म्हणावं लागेल.

‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ चित्रपटाच्या कमाईबद्दल माहिती देणाऱ्या एका पोस्टचा स्क्रिनशॉट दिग्दर्शक श्री नारायण सिंग यांनी फेसबुकवर शेअर केला. चित्रपटाला मिळालेल्या या यशानंतर प्रतिक्रिया जाणून घेण्याकरिता ‘इंडियन एक्स्प्रेस’ने त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ‘प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून मी भारावून गेलो. चित्रपटाला इतकं यश मिळेल याची मी कल्पनाच केली नव्हती. दिग्दर्शक म्हणून हा माझा पहिलाच चित्रपट आहे आणि पहिल्याच चित्रपटाने १०० कोटींवर कमाई करणे म्हणजे हा माझ्यासाठी आणि संपूर्ण टीमसाठी खूप मोठं यश आहे. यामुळे मला पुढे काम करण्याचा आत्मविश्वास मिळाला आहे. समाजाला चांगला संदेश देणाऱ्या चित्रपटांची निर्मिती करायला मला यापुढेही नक्कीच आवडेल.’

Tumhari Sulu: विद्या बालनचा ‘हा’ व्हिडिओ पाहून तुम्हीही तिच्या प्रेमात पडाल

अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांची मुख्य भूमिका असलेला ‘टॉयलेट- एक प्रेम कथा’ हा या वर्षीचा पहिल्या आठवड्यात सर्वात जास्त कमाई करणारा सहावा सिनेमा ठरला. देशभरातील सुमारे ३००० स्क्रिन्सवर प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी १३.१० कोटींची कमाई केली होती.

चित्रपट समीक्षक आणि व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट केलेल्या माहितीनुसार ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’च्या पहिल्या दहा दिवसांची कमाई पुढीलप्रमाणे दिली आहे :

पहिला दिवस (शुक्रवार) – १३.१० कोटी रुपये

दुसरा दिवस (शनिवार) – १७.१० कोटी रुपये

तिसरा दिवस (रविवार) – २१.२५ कोटी रुपये

चौथा दिवस (सोमवार) – १२ कोटी रुपये

पाचवा दिवस (मंगळवार) – २० कोटी रुपये

सहावा दिवस (बुधवार) – ६.५० कोटी रुपये

सातवा दिवस (गुरुवार) – ६.१० कोटी रुपये

आठवा दिवस (शुक्रवार) – ४ कोटी रुपये

नववा दिवस (शनिवार) – ६.७५ कोटी रुपये

दहावा दिवस (रविवार) – ८.२५ कोटी रुपये