‘टॉयलेट : एक प्रेम कथा’, ‘पॅडमॅन’ यांसारख्या चित्रपटांची निर्माती प्रेरणा अरोरा हिला आर्थिक गुन्हे प्रतिबंधक शाखेने अटक केली आहे. ‘क्रिअर्ज एंटरटेन्मेंट’ ही प्रेरणाची निर्मिती संस्था असून या बॅनरअंतर्गत तिने काही प्रसिद्ध चित्रपटांची निर्मिती केली आहे. १६ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. याआधीही प्रेरणावर आर्थिक फसवणुकीचे बरेच आरोप करण्यात आले होते.

पद्मा फिल्म्सच्या अनिल गुप्ता यांनी प्रेरणाविरोधात आर्थिक फसवणुकीचा आरोप केला आहे. याप्रकरणी क्रिअर्ज एंटरटेन्मेंटविरोधात सप्टेंबर महिन्यात एफआरआयसुद्धा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी प्रेरणाने सर्व आरोप फेटाळून लावले होते.

‘केदारनाथ’ या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा प्रेरणा सांभाळत होती. परंतु दिग्दर्शक अभिषेक कपूरनेही तिच्यावर पैसे थकविल्याचा आरोप केला होता. या वादामुळे प्रेरणाने ‘केदारनाथ’च्या निर्मितीतून काढता पाय घेतला. इतकंच नव्हे तर जॉन अब्राहमच्या जेए एंटरटेन्मेंटनंही क्रिअर्जविरोधात कायदेशीर नोटीस बजावली आहे.

याआधी एकाहून अधिक पासपोर्ट आणि पॅन कार्ड बाळगल्याप्रकरणी प्रेरणाला अटक झाली होती. तर मसाज करणाऱ्या महिलेला तिचा मोबदला दिला नसल्याचा आरोपही तिच्यावर करण्यात आला होता. शिवीगाळ करत हात उगारल्याची तक्रार संबंधित महिलेने दाखल केली होती. असे एक ना अनेक आरोप निर्माती प्रेरणावर करण्यात आले आहेत.