चीनमधील वुहान शहरातून उद्रेक झालेल्या करोना विषाणूने जगभरात त्याचे पाय पसरवले आहेत. आतापर्यंत चीनसह इतर ९० देशांमध्ये हा विषाणू पसरला आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचं वातावरण आहे. सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत प्रत्येक जण या विषाणूपासून वाचण्यासाठी योग्य ती खबरदारी घेत आहेत. मात्र योग्य ती खबरदारी घेऊनही हॉलिवूडमधील एका लोकप्रिय अभिनेत्याला आणि त्याच्या पत्नीला करोनाची लागण झाला आहे. या अभिनेत्याने ट्विटरच्या माध्यमातून त्याला आणि पत्नीला करोनाची लागण झाल्याचं सांगितलं.

हॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता टॉम हँक्स (Tom Hanks) आणि त्याची पत्नी रिटा विल्सन (Rita Wilson) यांना करोनाची लागण झाली आहे. एका चित्रपटाच्या निमित्ताने हे दोघे ऑस्ट्रेलियामध्ये असून त्यांना लागण झाल्याचं टॉमने सांगितलं.

“सर्दी आणि अंगदुखीमुळे आम्हाला प्रचंड थकवा जाणवत होता. रिटाला तर सतत थंडी वाजून ताप येत होता. त्यामुळे ही परिस्थिती पाहता आम्हाला रुग्णालयात जाऊन तपासणी करणं योग्य वाटलं. त्यानुसार आम्ही आवश्यकत्या तपासण्या केल्या. यात आम्हाला करोनाची लागण झाल्याचं निदान झालं”, असं टॉम म्हणाला.

पुढे तो म्हणतो, “आता आम्ही पुढे काय करावं? वैद्यकीय अधिकाऱ्यांचे काही नियम असतात ते आम्हाला पाळावे लागणार आहेत. आमच्या नियमित वैद्यकीय चाचण्या होतील. तसंच नागरिकांच्या सुरक्षेसाठी आम्हाला वेगळं ठेवलं जाईल. मात्र हे सारं करणं गरजेचं आहे. आमच्याविषयीचे अपडेट्स आम्ही देत राहू पण तुम्ही तुमची काळजी घ्या”.

वाचा : जिनादेखील डुकराचं मांस खायचे आणि व्हिस्की पित होते – जावेद अख्तर

दरम्यान, टॉमचं ट्विट पाहिल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली आहे. आतापर्यंत हे ट्विट ४२२.६ हजार लोकांनी लाईक केलं असून १२१ हजार जणांनी रिट्विट केलं आहे.