चीनमधील वुहान शहरातून उद्रेक झालेल्या करोना विषाणूने जगभरात त्याचे पाय पसरवले आहेत. आतापर्यंत चीनसह इतर ९० देशांमध्ये हा विषाणू पसरला आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचं वातावरण आहे. सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत प्रत्येक जण या विषाणूपासून वाचण्यासाठी योग्य ती खबरदारी घेत आहेत. काही दिवसापूर्वी हॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता टॉम हँक्स (Tom Hanks) आणि त्याची पत्नी रिटा विल्सन (Rita Wilson) यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. परंतु आता हँक्स आणि त्याच्या पत्नीने करोनावर मात केली असून ते घरी परतले आहेत.

‘इंडिया टुडे’नुसार, हँक्सने ट्विट करत त्याने आणि त्याच्या पत्नीने रिटाने करोनावर मात केल्याचं सांगितलं आहे. रिटा आणि हँक्स ऑस्ट्रेलियामध्ये असताना त्यांना करोनाची लागण झाली होती. मात्र योग्य ते उपचार घेतल्यानंतर दोघांनीही करोनावर मात केली आहेत. त्यामुळे आता हे दोघंही अमेरिकेतील त्यांच्या लॉस एंजलिस येथील घरी परतले असून त्यांच्या आरोग्याची काळजी घेत आहे.

एका चित्रपटाच्या निमित्ताने हँक्स आणि रिटा दोघे ऑस्ट्रेलियामध्ये गेले होते. तेथे त्यांना करोनाची लागण झाली होती. याविषयी हँक्स यांनी १२ मार्च २०२० रोजी एक ट्विट करत माहिती दिली होती.  करोनावर उपचार घेत असताना त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं. विशेष म्हणजे येथे हँक्स त्यांचा टाइपरायटर घेऊन गेले होते.

दरम्यान, हँक्स आणि त्यांची पत्नी करोनामुक्त झाले असले तरीदेखील काही हॉलिवूड कलाकार अजूनही करोनाशी सामना करत आहेत. इदरिस एल्बा, जेम्स बॉन्ड एक्ट्रेस ओल्गा, विनोदवीर कॅथी ग्रिफिन यांना करोनाची लागण झाली आहे.