अभिनेता शाहरूख खान याच्या बहुचर्चित ‘फॅन’ चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षक यांच्याकडून चांगला प्रतिसाद असला तरी हा चित्रपट म्हणजे मी एकप्रकारे पत्करलेला धोका होता, असे मत शाहरूखने व्यक्त केले आहे. आत्तापर्यंत प्रेक्षकांनी बघितले नाही असे काही तरी दाखविण्याच्या हेतूने मी हा चित्रपट केला. ‘फॅन’ हा पारंपारिक प्रेक्षकवर्गाला आवडेलच असा चित्रपट नाही. मात्र, प्रेक्षकांना तो आवडेल या अपेक्षेने मी हा धोका पत्कारला. मात्र, प्रेक्षकांना या चित्रपटात एखादे गाणे किंवा डान्स असावा अशी अपेक्षा होती. मी अवास्तव अपेक्षा बाळगत नसल्याचे, शाहरूखने ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
बॉलीवूडमधील २० वर्षांच्या कारकीर्दीत शाहरूखचे ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’, ‘कुछ कुछ होता है’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘हॅपी न्यू इयर’ यासारखे पारंपरिक चित्रपट हिट ठरले होते. तर दुसरीकडे त्याच्या ‘स्वदेश’, ‘चक दे इंडिया’ या चित्रपटांना तितकेसे यश मिळाले नव्हते. ‘दिलवाले’ हा माझा शेवटचा चित्रपट होता. त्यामध्ये उडणाऱ्या गाड्या, गाणी, डान्स असे सर्व काही होते. पारंपरिक प्रेक्षकवर्गाने हा चित्रपट बघितला तर इतरांनी तो पाहिला नाही. हा चित्रपट बनवताना सगळ्यांनी तो बघावा, अशी कल्पना त्यामागे होते. याउलट ‘स्वदेश’ हा चित्रपट बनवताना तो बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी ठरणार नाही, हे मी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकला सांगितले होते. मात्र, तरीही त्याने माझ्यासारख्या स्टार अभिनेत्याला घेऊन हा चित्रपट तयार केला. मला वाटते की, आपण याच गोष्टीचे कौतूक केले पाहिजे. नव्या दमाचे दिग्दर्शक प्रस्थापित कलाकारांऐवजी नव्या कलाकारांना घेऊन चित्रपट बनवतात, ही माझ्यादृष्टीने कौतुकाची बाब आहे. मात्र, एखादा प्रस्थापित कलाकार, दिग्दर्शक, निर्माता ‘फॅन’सारखा वेगळ्या धाटणीचा चित्रपट करणे, हे अधिक कौतुकास्पद असल्याचे शाहरूखने म्हटले. काहीतरी वेगळे केल्यामुळे एक व्यक्ती म्हणून मला पुढे जाण्यासाठी उर्जा मिळते. त्यामुळे तुमचे चित्रपटनिर्मितीचे कौशल्य अधिक सुधारते. अशाप्रकारे तुम्ही सहा महिन्यांनी व्यावसायिक चित्रपट करू शकता. विल स्मिथ ( अमेरिकन अभिनेता) नेमके हेच करतो. तो बॉक्स ऑफिसवर चालणारे आणि न चालणारे अशा दोन्ही प्रकारचे चित्रपट करतो. जास्तीत जास्त अभिनेत्यांनी असे करायला पाहिजे, असे शाहरूखने म्हटले. शाहरूखने यावेळी चाह्त्यांचे दोन प्रकार असतात असे सांगितले. एका वर्गाला धाटणीबाहेरचे चित्रपट आवडतात तर दुसऱ्या वर्गाला व्यावसायिक चित्रपट आवडतात. या दुसऱ्या वर्गाला ‘फॅन’ हा चित्रपट माझ्या नेहमीच्या चित्रपटासारखा नसल्यामुळे आवडला नसेल, असे शाहरूखने म्हटले.