बायोपिकचं प्रस्थ बॉलिवूडमध्ये अगदी उत्तम पद्धतीने स्थिरावलं असून, बरेच निर्माते- दिग्दर्शक असेच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यासाठी प्रयत्नशील असतात. २०१८ या वर्षातही बायोपिकच्या निमित्ताने बऱ्याच व्यक्तींचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर उलगत आहे असंच म्हणावं लागेल. ‘पॅडमॅन’, ‘ओमर्ता’, ‘राजी’ या चित्रपटांमागोमागच आता आणखी एक बहुचर्चित बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. तो बायोपिक म्हणजे ‘संजू’.

राजकुमार हिरानी दिग्दर्शित या चित्रपटातून अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या प्रसंगांवर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. रणबीर कपूरची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांमध्ये असलेली बायोपिकची लोकप्रियता पुन्हा एकदा पाहायला मिळतेय. पण, संजूच्या आधीही याच धाटणीच्या काही चित्रपटांनी चाहत्यांची मनं जिंकत बॉक्स ऑफिसवरही छाप सोडली. चला तर मग मजर टाकूया अशाच काही चित्रपटांवर…

बँडिट क्वीन-
१९९४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘बँडिट क्वीन’ हा चित्रपट कोणीही विसरु शकलेलं नाही. ७० च्या दशकात उदयास आलेल्या फूलन देवीच्या आयुष्यावर या चित्रपटाचं कथानक आधारलेलं होतं. सीमा बिस्वास यांनी साकारलेली फूलनदेवीची भूमिका आजही प्रेक्षकांना एका वेगळ्याच जगात घेऊन जाते. शेखर कपूर दिग्दर्शित या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीच्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

द डर्टी पिक्चर-
आपल्या बोल्ड अंदाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेत्री सिल्क स्मिताच्या आयुष्यावरुन ‘द डर्टी पिक्चर’च्या निमित्ताने पडदा उचलण्यात आला होता. सिल्कच्या भूमिकेत झळकलेल्या विद्या बालनच्या अभिनयाचा वेगळाच चेहरा या चित्रपटाच्या निमित्ताने पाहायला मिळाला होता. विद्याशिवाय ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह आणि अभिनेता इम्रान हाश्मीसुद्धा या चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकून गेले.

भाग मिल्खा भाग-
‘फ्लाइंग सीख’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील धावपटू मिल्खा सिंग यांच्या आयुष्यावर ‘भाग मिल्खा भाग’च्या निमित्ताने प्रकाशझोत टाकण्यात आला होता. राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित या चित्रपटाने प्रेक्षक आणि समीक्षक अशा दोन्ही वर्गांवर छाप सोडली होती. भारत- पाकिस्तान फाळणीवरही या चित्रपटातून अतिशय संवेदनशीलपणे भाष्य करण्यात आलं होतं. ज्यामाध्यमातून मिल्खा सिंग यांचं बालपणही दाखवण्यात आलं होतं.

पान सिंह तोमर-
इरफान खानची महत्त्वाची भूमिका असणारा ‘पान सिंह तोमर’ या चित्रपटातं नाव या यादीतून वगळता येणार नाही. सैन्यदलात काम करणारा एक सैनिक परिस्थितीमुळे कशा प्रकारे दरोडेखोर होतो, याचं प्रभावी चित्रण या चित्रपटातून करण्यात आलं होतं. बऱ्याच पुरस्कारांवर या चित्रपटाने मोहर उमटवली होती. त्यासोबतच या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक तिग्मांशू धुलियाने मध्य प्रदेश प्रांतातील खरी परिस्थिती प्रेक्षकांसमोर मांडली होती.

नीरजा-
सोनम कपूरच्या कारकिर्दीत अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या ‘नीरजा’ या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं तर जिंकलीच. पण, त्यासोबतच सोनमला राष्ट्रीय पुरस्कारापर्यंतही पोहोचवलं. फ्लाइट अटेंडंट नीरजा भनोटच्या आयुष्यावर आणि अखेरच्या विमान प्रवासावर या चित्रपटातून प्रकाशझोत टाकण्यात आला होता. अवघ्या काही तासांच्या या चित्रपटातून नीरजाने कशा प्रकारे विमानातील प्रवाशांचे प्राण वाचवले होते, याचं वास्तवदर्शी चित्रण करण्यात आलं होतं.