01 March 2021

News Flash

बॉलिवूड कलाकारांपेक्षाही जास्त कमावतात ‘हे’ टेलिव्हिजन सेलिब्रिटी

कोटींच्या घरात असणारा त्यांच्या मानधनाचा आकडा पाहून अनेकांना धक्काच बसेल असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

टेलिव्हिजन सेलिब्रिटी

कलाविश्वात कलाकारांच्या वाट्याला येणारं मानधन हा नेहमीच चर्चेचा मुद्दा असतो. त्यातही आपल्या आवडीच्या कलाकाराला नेमकं किती मानधन मिळतं याविषयी अनेक चाहत्यांमध्ये कुतूहल लागून राहिलेलं असतं. लाखाच्या आणि कोटींच्या घरात मानधन घेणारे हे सेलिब्रिटी, त्यांचं वार्षिक उत्पन्न आणि त्यांच्या जीवनशैलीचा, राहणीमानाचाही अनेकांना हेवा वाटतो.

चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या कलाकारांपेक्षा कमी मानधन मिळतं असा अनेकांचाच समज आहे. पण, तुम्हाला माहितीये का, टेलिव्हिजन विश्वात असेही काही सेलिब्रिटी आहेत, जे कमाईच्या बाबतीत काही बी- टाऊन सेलिब्रिटींनाही मागे टाकतात. चला तर मग नजर टाकूया अशाच काही सेलिब्रिटींवर…

वाचा : Top 5 : ‘संजू’आधीही ‘या’ वास्तवदर्शी बायोपिकने जिंकलेली प्रेक्षकांची मनं

कपिल शर्मा- ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’पासून सुरु झालेला कपिल शर्माचा प्रवास आज त्याला कारकिर्दीत बराच पुढे आणण्यात मदतीचा ठरला आहे. विविध कार्यक्रमांमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होणाऱ्या कपिलने त्यानंतर काही विनोदी कार्यक्रमांच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी घेतली. पुढे जाऊन ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ आणि ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमांची धुरा सांभाळत कपिलने स्वत:ची अशी ओळख प्रस्थापित केली. इतकच नव्हे, तर मानाच्या समजल्या जाणाऱ्या फिल्मफेअर पुरस्कारांच्या सूत्रसंचालनाची जबाबदारीही त्याने लिलया पेलली. वर्षभरात कपिलच्या कमाईचा आकडा जवळपास ३० कोटींच्या घरात जातो. काही संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार कपिल त्याच्या कार्यक्रमाच्या एका भागासाठी जवळपास एक ते दीड कोटी रुपये इतकं मानधन घेतो. विविध कार्यक्रम आणि चित्रपटांव्यतिरिक्त तो काही जाहिरातींचाही भाग आहे, ज्यामुळेही त्याच्या वार्षिक उत्पन्नाचा आकडा झपाट्याने वाढतो. मोठमोठ्या लक्झरी कार्सची आवड असणाऱ्या कपिलकडे Mercedes Benz S350 CDI, Range Rover Evoque SD4 आणि Volvo XC 90 या कार आहेत.

रोनित रॉय- कारकिर्दीच्या सुरुवातीला अपयश येऊनही दुसऱ्या इनिंगमध्ये यशस्वी ठरलेला टेलिव्हिजन अभिनेता म्हणजे रोनित रॉय. फक्त छोट्या पडद्यावरच नाही, तर काही चित्रपटांमध्येही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. चित्रपट, विविध कार्यक्रम यांच्या बळावर रोनितच्या वार्षिक उत्पन्नाचा आकडा १० कोटींच्या घरात आहे. एका चित्रपटासाठी तो जवळपास २ ते ३ कोटी इतकं मानधन घेतो. रोनितची स्वत:ची सिक्युरिटी एजन्सीही आहे. ज्याच्या क्लाएंटच्या यादीत शाहरुख खान, अमिताभ बच्चन, सलमान खान, आमिर खान यांच्या नावांचा समावेश आहे. रोनितच्या कार्सच्या कलेक्शनमध्ये Audi Q7 आणि Audi R8 या दोन महागड्या कार आहेत.

सुनील ग्रोवर- ‘गुत्थी’, ‘डॉ. मशहूर गुलाटी’ म्हणून नावारुपास आलेला आणि प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतलेल्या विनोदवीर सुनील ग्रोवर याच्या नावाचा समावेशही या यादीत होतो. नाही म्हटलं तरीही त्याचा मानधानाचा आकडा पाहून अनेकांना धक्काच बसतो. सुनीलच्याही मानधनाचा आकडा आता वाढता असून, तो विविध कार्यक्रमांना हजेरी लावण्यासाठी साधारण एक कोटी इतकं मानधन आकारतो. सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर सुनीलचं वार्षिक उत्पन्न जवळपास तीस कोटींच्या घरात आहे. त्याच्याकडे BMW Series 5, Audi आणि Range Rover या महागड्या कार आहेत.

शिवाजी साटम- ‘दया… कुछ तो गडबड है…’ असं म्हटलं की डोळ्यांसमोर एकच चेहरा उभा राहतो. तो चेहरा म्हणजे शिवाजी साटम यांचा. विविध मराठी, हिंदी चित्रपट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सीआयडी या मालिकेमुळे शिवाजी साटम यांनी कलाविश्वात आपंल वेगळं स्थान निर्माण केलं. मानधनाच्या आकडेवारीच्या बाबतीत सांगायचं झालं तर, तेसुद्धा या शर्यतीत असून, कोणत्याही कार्यक्रमाच्या एका भागासाठी ते एक कोटीहून अधिक मानधन घेत असल्याची माहिती काही संकेतस्थळांनी प्रसिद्ध केली आहे. साटम यांच्याकडे, जवळपास ५० लाख किमतीची BMW X3 ही कार आहे.

मिशल रहेजा- सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीतील एक अनपेक्षित नाव म्हणजे मिशल रहेजाचं. अभिनय, गायन, निर्मिती या क्षेत्रांमध्ये सक्रिय असणारा मिशल हा एक व्यावसायिकही आहे. त्याचं वार्षिक उत्पन्न हे १५ कोटींच्या घरात असल्याचं कळत आहे. १२ वर्षांच्या कारकिर्दीत अवघ्या आठ मालिकांचा भाग असूनही त्याच्या मानधनाचा आकडा मात्र अनेकांनाच भुवया उंचावण्यास भाग पाडतो. त्याला स्पोर्ट्स बाईकची प्रचंड आवड असून, बऱ्याचदा त्याला Ducati Monster या बाईकवर पाहिलं गेलं आहे.

(वरील माहिती विविध संकेतस्थळांवरील संदर्भाच्या सहाय्याने घेण्यात आली असून, लोकसत्ता ऑनलाइनने याची खातरजमा केलेली नाही.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2018 9:21 am

Web Title: top 5 tv stars celebrities who earn more than bollywood actors who are they
Next Stories
1 सुनील दत्त यांनी लिहिलेलं पत्र आणि ‘संजू’चा योगायोग
2 फ्लॅशबॅक : सौतन की सौतन…
3 सेलिब्रिटी लेखक : आणि हत्ती पाळायचा राहिला… – मनवा नाईक
Just Now!
X