दिलीप ठाकूर
कसोटी क्रिकेटमधील दीर्घकालीन अशी नाणेफेक परंपरा बंद करावी यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्तरावर बरीच चर्चा झाली आणि अखेर ती परंपरा कायम ठेवूनच कसोटी क्रिकेटचा आनंद घेण्याचा निर्णय झालाय. चित्रपट आणि नाणेफेक यांचेही नाते असेच केवढे तरी घट्ट.
आज तुमच्या नात्यात किंवा परिसरात वयाची ऐंशी ओलांडलेले चित्रपट रसिक असतील तर त्याना फक्त त्यांनी त्यांच्या लहानपणी किती आण्यात चित्रपट पाहिला हे विचारा. ते पटकन सांगतील, चार आण्यात चित्रपट पाहिल्याचे आठवतेय. मुठीत नाणी घट्ट पकडून तिकीट खिडकीतून हात आत घालत असू… अशी आठवणदेखील सांगतील.

असे जुन्या आठवणीत रमत ते चित्रपटाचे मूल्य वाढवतात. अगदी ऐंशीच्या दशकाच्या अखेरीपर्यंत मुंबईत ताडदेवचे डायना थिएटर तर जवळपास सर्वच ग्रामीण भागात स्टाॅलचे तिकीट पासष्ट पैसे आकारत असे. म्हणजेच पाच, दहा, वीस पैशाची नाणीच मोजून द्यायला हवीत.

फार पूर्वी तर चित्रपटातील हिरोची एण्ट्री, आवडते गाणे अथवा दृष्य सुरू झाले की पडद्यावर नाणी (चिल्लर) उडवली जात. भगवानदादांच्या ‘अलबेला’ (१९५१) च्या ‘भोली सुरत दिल के खोटे…’ या आणि इतरही अनेक गाण्यांवर प्रेक्षक विलक्षण फिदा होत नाणी उडवत असत. ‘धर्मा’ (१९७३) च्या प्राण व बिंदू यांच्यावरील ‘राज की बात कहदू तो…’ कव्वालीपर्यंत ही ‘पडद्यावरची नाणेफेक’ कायम होती.
पडद्यावरील नाणेफेकीचे आणि नाण्यांचे प्रसंगही बरेच व विविधतापूर्ण. आर. के. फिल्मच्या ‘बूट पाॅलीश’मध्ये असेच बूट पाॅलीश करुन सुटे पैसे कमावणे आणि मग ते रात्री मोजणे होते. राजश्री प्राॅडक्शन्सच्या ‘दोस्ती’मधील दुर्दैवी परिस्थितीतून भीक मागावी लागणार्‍या दोन अपंग मित्रांना मिळणारे एकेक नाणे महत्त्वपूर्ण ठरते.

अमरजीत दिग्दर्शित ‘गॅम्बलर’मध्येही नायकाला (देव आनंद) जुगारात असेच एक नाणे सदुपयोगी ठरते. पत्त्याच्या डावात नायकाच्या सगळ्याच खेळी चुकतात आणि तो सगळेच पैसे त्यात हरल्याने कफल्लक होतो. प्रचंड निराश होतो. आता तो खेळातून बाहेर पडणार तेवढ्यात त्याला पॅन्ट व बूटात एक नाणे अडकल्याचे दिसते. त्याला प्रचंड हायसे वाटते. देव आनंदच तो. मान तिरकी करुन स्वतःशीच हसतो आणि पुन्हा खेळायला लागताच नशीब त्याला साथ देते. तो एकेक डाव जिंकत जातो. जुगारावरच्या चित्रपटात असा देशी-विदेशी नाण्याचा खेळ अनेकदा दिसलाय. ‘आशिक हू बहारो का ‘( राजेश खन्ना), ‘बारुद’ (ऋषि कपूर) यात कॅसिनो खेळात विदेशी नाणी दिसतात.

‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ मधील मकरंद अनासपुरे निवडणूक अर्ज दाखल करताना गोणीभर सुट्टी नाणी घेऊन जातो आणि वेगळीच राजकीय खेळी खेळतो. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण त्यानंतर एका गावात खरोखरच असा प्रकार घडल्याची बातमी ग्रामीण वृत्तपत्रात आली आणि ती खुद्द मकरंद अनासपुरेला व्हाॅटस अपवर मिळाली आणि एका भेटीत त्याने ती मला दाखवली.

चित्रपटातील नाणे यात यश चोप्रा दिग्दर्शित व सलिम जावेद लिखित ‘दीवार’ (१९७५) मधील प्रसंग तुम्हाला नक्कीच लक्षात असेल. छत्रपती शिवाजी टर्मिनसबाहेर लहानपणीचा विजय बूट पाॅलीश करुन गुजराण करत असतो. अशातच एक गिर्‍हाईक त्याने बूट पाॅलीश केल्यावर त्याची मजूरी देताना त्याच्या अंगावर नाणे फेकते. त्यावर विलक्षण स्वाभिमानी विजय म्हणतो, “मै फेके हुये पैसे नही उठाता|”
कालांतराने विजय मोठा होतो (अमिताभ बच्चन) आणि तेव्हाही याच दृश्याचा संदर्भ देऊन अमिताभची व्यक्तिरेखा अधिक प्रभावी करण्यात अली होती.

आणि या सगळ्यात बहुचर्चित नाणेफेक सलिम जावेद लिखित व रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले ‘मधील! एव्हाना तो सगळाच प्रसंग तुम्हाला आठवला असेलच. गब्बरसिंगशी ( अमजद खान) लढण्यास कोण पुढे जाणार यासाठी वीरु ( धर्मेंद्र) व जय ( अमिताभ बच्चन) यांच्यात होणारी नाणेफेक जय जिंकतो. पण लढवय्या जय गब्बरसिंगकडून दुर्दैवाने मारला जातो. वीरु त्यानंतर नाणे पाहतो तर त्याला प्रचंड धक्काच बसतो. कारण दोन्ही बाजूने ते सारखेच असते. म्हणजेच जयला गब्बरसिंगचा पाडाव करताना आपल्या मित्राचा जीव धोक्यात घालायचा नसतो. चित्रपटात अन्य काही प्रसंगांमध्येदेखील जय नाणेफेकीचा वापर करताना दाखवला आहे. रमेश सिप्पीने हे नाणे खास बनवून घेतले होते. मिनर्व्हा चित्रपटगृहात हा नाणेफेक प्रसंग पाहणे आणि अनुभवणे थरारक होते. याचे कारण तेथे ७० एमएमचा प्रचंड पडदा होता व स्टीरिओफोनिक साऊंड सिस्टीम होती. आपण तेथे ‘शोले’ पहात असताना ते नाणे आपल्या आसपासच पडलयं असाच भारी फिल येई. आणि कितीदाही तेथे ‘शोले’ पाहताना हा नाणेफेक थरार जणू नवीन अनुभव वाटे.

रजनीकांतची मनोरंजनाची जातकुळी पाहता त्याच्याही भरपूर व भन्नाट करमणूकीमध्ये नाणे हवेच. ‘शिवजी- द बाॅस’मध्ये ते आहे. खलनायकाकडून पूर्णपणे कफल्लक झाल्यावर रजनीकांतला असेच एक शिल्लक नाणे पुन्हा प्रचंड उभारी देते. असे प्रसंग अतिशयोक्तपूर्ण वाटतात पण त्यातील आशावाद खूपच महत्त्वपूर्ण आहे. ते ‘आशेचे नाणे ‘ मात्र खरेच. चित्रपट आणि नाणे यांचे नाते असे विविध स्तरावर वाटचाल करणारे. मात्र चित्रपट यशस्वी होण्यासाठी गुणवत्तेचे नाणे खणखणीत हवे.