प्रेक्षकांना पुन्हा एकदा खळखळून हसवण्यासाठी ‘धमाल’ फ्रँचाइजीमधील तिसरा चित्रपट ‘टोटल धमाल’ सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. माधुरी दीक्षित, अजय देवगण, अनिल कपूर, अर्शद वारसी, रितेश देशमुख, जावेद जाफ्री, जॉनी लिव्हर अशी मोठी स्टारकास्ट या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.

नुकताच प्रदर्शित झालेला ट्रेलर पाहता हा चित्रपट विनोदाने परिपूर्ण असल्याचं दिसून येत आहे. या चित्रपटामध्ये झळकलेले अनेक कलाकार यापूर्वी ‘धमाल’ आणि ‘डबल धमाल’ या चित्रपटांमध्ये झळकले आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने तब्बल १७ वर्षानंतर अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित एकत्र स्क्रीन शेअर करणार आहे. हा चित्रपट २२ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

ट्रेलरच्या सुरुवातीलाच ५० कोटी रुपयांचे गुप्त धन आणि ते मिळविण्यासाठी संपूर्ण टीमने केलेले कारनामे या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहेत. पैशांसाठी जनकपूरपर्यंतचा प्रवास करताना या टीमला येणाऱ्या अडचणी अत्यंत सुंदर आणि विनोदीरित्या मांडण्यात आल्या आहेत.

दरम्यान, या चित्रपटाच्या माध्यमातून हॉलिवूडची अॅनिमल सेलिब्रिटी क्रिस्टल देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या ट्रेलरमध्ये तिचीही एक झलक पाहायला मिळाली आहे.