थ्री इडियट्स हा बॉलिवूडमधला सर्वात गाजलेला चित्रपट. या चित्रपटातील शेवटच्या दृश्यात दाखवण्यात आलेल्या लेह मधल्या द ड्रुक पद्म कार्पो स्कूललाही यामुळे तुफान प्रसिद्धी मिळाली. कल्पनेपलीकडली नितांत सुंदर आणि प्रयोगशील शाळा अशी ओळख निर्माण केलेली ही शाळा पाहण्यासाठी दरदिवशी शेकडो पर्यटक येथे येतात.

या शाळेतील ‘रँचो वॉल’ तर पर्यटकांमध्ये विशेष आकर्षणाची बाब ठरली. शाळेच्या भिंतीवर लघुशंका करणाऱ्या चतुरला विद्यार्थ्यांनी शिकवलेला धडा असं मजेशीर दृश्य या ठिकाणी चित्रीत करण्यात आलं होतं. त्यानंतर या भितींवर शाळेकडून रंगकामही करण्यात आलं. चित्रपटात दाखवण्यात आलेली ही भिंत पाहण्यासाठी आणि तिच्याशेजारी स्वत:चे फोटो काढून घेण्यासाठी दरवर्षी पर्यटकांची मोठी गर्दी जमते.

मात्र यापुढे पर्यटकांना तिथे जाता येणार नाही. शाळेनं या परिसरात पर्यटकांना पूर्णपणे बंदी घालण्याचं ठरवलं आहे. पर्यटकांमुळे विद्यार्थ्यांचं लक्ष विचलित होतं. मुलं अभ्यासावर लक्ष केंद्रीत करु शकत नाही. तसेच पर्यटकांमुळे शाळा परिसरात कचराही होतो म्हणून शाळेच्या मुख्याध्यापकांनी हा निर्णय घेतला असल्याचं समजत आहे.