देशात ‘अच्छे दिन कब आयेंगे?’ या प्रश्नानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न कोणता असेल तर सलमान खान केव्हा लग्न करणार? या प्रश्नाचे उत्तर तर खुद्द सलमान खानकडेही नसेल. पण तुम्हाला माहित आहे का याच विषयावर आता बॉलिवूडमध्ये एक सिनेमा येत आहे. ८ डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे नावही फार आकर्षित करणारे आहे. या सिनेमाचे नाव आहे ‘सल्लू की शादी’. या सिनेमाची कथा सलमानच्या लग्नावर होणाऱ्या चर्चांवर आधारित आहे.

टी- सीरीजच्या या छोट्या बजेटच्या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. सिनेमाचा हा ट्रेलर अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. या सिनेमामुळे सलमान खानच्या लग्नाची चर्चा पुन्हा एकदा जोरात सुरू होईल यात काही शंका नाही. सिनेमाच्या पोस्टरमध्ये एका नवऱ्या मुलीचा हात आणि नवऱ्या मुलाचा हात दाखवण्यात आला आहे. नवऱ्या मुलाच्या हातात सलमान घालतो तसेच ब्रेसलेट आहे. ट्रेलरमध्ये अनेकजण ‘जोवर भाईजान लग्न करणार नाही तोवर आम्हीही लग्न करणार नाही…’ असे बोलताना दिसतात.

या सिनेमात सलमान दिसणार की नाही याबाबत गुप्तता बाळगण्यात आली आहे. पण सलमानचे चाहते हा सिनेमा पाहण्याची संधी सोडणार नाहीत हे मात्र नक्की. या ट्रेलरच्या शेवटी, ‘८ डिसेंबरला लग्न आहे आणि मी येतोय,’ असा सलमानचाच आवाज ऐकू येतो. या विनोदीपटाचे दिग्दर्शन मोहम्मद इसरार अंसारी यांनी केले आहे. आलिया नावाच्या मुलीभोवती सिनेमाची कथा फिरते, जिला फक्त सलमानशी लग्न करायचे असते. या सिनेमात जीनत अमान, किरण कुमार आणि असरानी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.