भारतीय दूरसंचार नियामक आयोगाने (ट्राय) ग्राहकांच्या सोयीसाठी नवीन अ‍ॅप सुरू केले असून याद्वारे ग्राहकांना केबल, डीटीएचसाठी आपल्या पसंतीच्या वाहिन्यांची निवड करणे सहज शक्य होणार आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना नको असलेल्या वाहिन्या वगळता येतील. या अ‍ॅपला ग्राहकांचा प्रतिसाद मिळत असल्याचे ‘ट्राय’तर्फे सांगण्यात आले आहे.

आतापर्यंत ग्राहकांना केबलचालकाच्या माध्यमातून वाहिन्यांच्या निवडीचा पर्याय देण्यात आला होता.  परिणामी, केबलचालकांनी निश्चित केलेल्या वाहिन्या पाहाव्या लागत असल्याने  ग्राहकांच्या या समस्येचे निराकारण करण्यासाठी ‘ट्राय’ने अ‍ॅप तयार केले असून याद्वारे ग्राहकांना केबल आणि डीटीएचसाठी आवडीच्या वाहिन्यांची निवड करता येईल.

कसे डाऊनलोड कराल

हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर अथवा आयओएसवर उपलब्ध आहे. यानंतर ग्राहकांनी बुके, अ ला कार्टे वाहिन्या, महिन्याचे दर, सेट टॉप बॉक्सचा तपशील, ही माहिती भरायची आहे. ही माहिती भरल्यावर व्ह्य़ू माय प्लॅन या पर्यायावर क्लिक केल्यावर ग्राहकांना आपल्या आवडीनुसार  वाहिन्यांची निवड करता येईल. ग्राहकांनी वाहिन्यांची निवड करताना नोंदणीकृत मोबाइलचा वापर करावा, अशीही सूचना ‘ट्राय’तर्फे करण्यात आली आहे.