|| रवींद्र पाथरे

स्त्री-पुरुष नातेसंबंध हे मानवी संबंधांतलं एक चिरंतन गूढ आहे. आणि जोवर मनुष्यप्राणी अंतज्र्ञानी होत नाही तोवर हे गूढ कायमच राहणार आहे. अर्थात ते तसं राहण्यातच माणसाच्या जगण्यातली गंमत आहे. असं काही रहस्यच उरलं नाही तर जगण्यात मौज ती काय? (लेखक व कलावंत मंडळी हे गूढ आपापल्या परीनं समजून घेण्याचा आणि आपल्याला झालेल्या आकलनातून त्याचे नानाविध कंगोरे उकलून दाखविण्याचा प्रयत्न करीत असतात.) असो. शुभा गोडबोले लिखित आणि राजन ताम्हाणे दिग्दर्शित ‘ट्रान्स अफेअर’ या नाटकात स्त्री-पुरुष संबंधांची चिकित्सा तर आहेच आहे; पण त्याच बरोबरीने पुरुषदेहात वेगळा लिंगभाव जपलेल्या व्यक्तीची होणारी प्रचंड घुसमटदेखील त्यात दर्शविली आहे.

निशा दफ्तरदार ही कॉर्पोरेट क्षेत्रातील एक उच्चपदस्थ स्त्री. आदित्य दिवाण या कॉर्पोरेट अधिकाऱ्याशी तिची दिल्लीत एका सेमिनारच्या निमित्ताने ओळख होते. त्याच वेळेस आदित्यची कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) विभागात बदली करण्यात आल्याचं त्याला कंपनीकडून कळवण्यात येतं. आदित्यला त्याच्या पदावरून हटवून कंपनीने एका अर्थी त्याला कंपनी सोडण्याचे संकेतच दिलेले असतात. त्यामुळे आदित्य वैफल्यग्रस्त होतो. या वयात आता पुन्हा नवी नोकरी शोधण्याइतकी ऊर्जा त्याच्यात उरलेली नसते. शिवाय घरच्या जबाबदाऱ्या आणि मुलांच्या करिअरच्या ऐन मध्यावर नोकरीत असं काही आकस्मिक घडणं हा त्याच्यासाठी प्रचंड धक्का असतो. तो असा निराश, विमनस्क असताना निशा त्याच्या नैराश्यावर सहानुभूतीची फुंकर घालते. त्याचा गमावलेला आत्मविश्वास परत मिळवून देण्याचा प्रयत्न करते. त्यातून त्यांच्यात स्नेहबंध निर्माण होतात. हळूहळू कळत-नकळत ते घट्ट होत जातात.

आदित्यची पत्नी प्रिया हीदेखील तिच्या ऑफिसमधले प्रॉब्लेम्स आणि मुलांच्या जबाबदाऱ्यांनी हैराण झालेली असते. आदित्यच्या ऑफिसमध्ये झालेला हा प्रॉब्लेम समजून घेण्यासाठी तिला फुरसद नसते. आदित्य तिला कंपनीतला प्रॉब्लेम सांगण्याचा प्रयत्न करतो खरा; परंतु आपल्याच प्रश्नांत प्रिया इतकी गुरफटलेली असते की ती त्याचं काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नसते. नवरा-बायकोच्या प्रदीर्घ नात्यात परस्परांना गृहीत धरणं आपसूकच घडत जातं. त्याचाच हा परिपाक असतो.

..नेमक्या याच नाजूक क्षणी निशा आदित्यच्या आयुष्यात येते आणि त्याच्या दुखावलेल्या अहम्वर फुंकर घालते. हे सगळं सहजच घडतं. आदित्य आणि प्रिया यांचं दुरावणं आणि निशा व आदित्यचं जवळ येणं नेमक्या याच भावनिक निर्वात पोकळीत घडतं. स्वाभाविकपणेच पुढची पायरीदेखील अपरिहार्य ठरते.

मात्र, निशा त्या पायरीवर पोहोचण्याआधीच आदित्यपासून दूर जाण्याचा निर्णय घेते. ती अमेरिकेला कायमचं निघून जायचं ठरवते. तसा निरोप ती आदित्यला मेसेजद्वारे पाठवते. आणि जाण्याअगोदर त्याला आपल्या हॉटेलवर शेवटचं भेटायला बोलावते. निशाचा हा मेसेज प्रियाच्या दृष्टीस पडतो आणि तिचं सबंध भावविश्वच उद्ध्वस्त होतं. आदित्य आणि आपल्यामधलं नातं इतकं तकलादू होतं? आपल्याशी २७ वर्षे संसार केल्यावर आदित्यला दुसऱ्या स्त्रीची अशी कशी काय भूल पडते? आमच्यात असं काय घडलं, की तो दुसऱ्या स्त्रीत गुंतावा? ..या आणि अशा प्रश्नांच्या भुंग्यांनी प्रियाला भंडावून सोडलं.

या प्रश्नांचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी ती निशाला तिच्या हॉटेलवर जाऊन भेटायचं ठरवते. तिथे त्या दोघींमध्ये जे संभाषण होतं त्यातून प्रियाला सत्य उलगडत जातं. तिथे एक क्षण असाही येऊन उभा ठाकतो, की निशा, आदित्य आणि प्रिया एकमेकांच्या आमनेसामने येतात. त्या अवघडल्या क्षणी निशाच्या कथनातून एक विलक्षण रहस्य बाहेर पडतं. आदित्यला मानसिक आधार देणारी निशा स्वत:च आयुष्यभर वेगळ्या लिंगओळखीमुळे निराशेच्या गर्तेत दिशाहीनपणे भटकत असते. त्या नैराश्यग्रस्तेतून बाहेर येण्यासाठी, कुटुंबानं व समाजानं आपला स्वीकार करावा म्हणून ती सतत धडपडत राहते. परंतु तिची खरी ओळख कळल्यावर प्रत्येक जण तिला टाळायचा प्रयत्न करतो.

निशाचं हे वास्तव रूप कळल्यावर आदित्यकडून तिला मानसिक, भावनिक आधार मिळतो का? तिच्यातला भिन्न लिंगभाव समजून घेणारं कुणी मिळतं का  तिला?

शुभा गोडबोले लिखित ‘ट्रान्स अफेअर’ या नाटकात स्त्री-पुरुष संबंधांचा त्रिकोण उलगडला जात असतानाच त्यास आकस्मिक एक वेगळीच कलाटणी मिळते आणि भिन्न लिंगभावाची भीषण समस्या आ वासून आपल्या समोर उभी राहते. या अचानक कलाटणीमुळे नाटकाचे दोन वेगळे तुकडे पडले आहेत. पहिल्यात स्त्री-पुरुष नातेसंबंधांचा ऊहापोह होतो. नको इतका वेळ तो लांबला आहे. ठरीव साच्यातच ती चर्चा झडते. तीत काहीच नावीन्य नसल्यानं ती कंटाळवाणी होते. स्त्री-पुरुष संबंधांच्या त्रिकोणाची गोष्ट ही आता खरं तर शिळी, कालबाह्य़ झाली आहे. आता त्या सगळ्याच्या कितीतरी पुढे आपण आलो आहोत. मुक्त संबंधांचंही समाजाला आता फार अप्रूप उरलेलं नाहीए. अशा वेळी निशा-आदित्य-प्रिया यांच्यातल्या त्रिकोणातून नवं काही हाती लागण्याची शक्यताच नव्हती. नवरा-बायकोतलं नातं ताजं ठेवायचं असेल तर त्यासाठी जाणीवपूर्वक मेहनत आवश्यक आहे.. परस्परांना त्यांनी गृहीत धरता नये, हे तर आता सर्वानाच कळून चुकलंय. वास्तवात प्रिया ज्या प्रकारे निशाकडे आदित्यसंबंधात कांगावा करते, ते तिच्या सामाजिक-आर्थिक स्तरास शोभणीय नाही. त्या कांगावखोरपणात कसलीही खोली नाही. एखादी सामान्य स्त्री नवऱ्याचं ‘प्रकरण’ कळल्यावर ज्या प्रकारे रिअ‍ॅक्ट होईल तसंच प्रियाचंही वर्तन आहे. (प्रियाची भूमिका साकारणाऱ्या प्रतिमा कुलकर्णी यांनाही तिचं हे थिल्लर वर्तन अभिप्रेत नसावं. म्हणूनच बहुधा त्या या भूमिकेत अनकम्फर्टेबल वाटत राहतात.) आदित्य आणि प्रिया यांच्यात दृढ भावबंध होते वा आहेत असं कधीच आढळत नाही. त्यांचं नातं पृष्ठपातळीवरचंच असावं अशी प्रेक्षकांची धारणा होते. ती खरीच आहे. अन्यथा हा तिढा उभयतांनी अधिक परिपक्वपणे हाताळला असता.

उरली गोष्ट आकस्मिक कलाटणीनंतरची.. निशाने आपली वेगळी लिंगओळख उघड केल्यावर प्रियाला धक्का बसतोच; पण आदित्यला त्याहून अधिक झटका बसतो. आपण एका ‘स्त्री’वर नाही, तर पुरुषावर प्रेम केलं केलं- हे त्याच्या लेखी धक्क्य़ाचं कारण होतं. त्यामुळे त्याला निशा एकाएकी परकी, दूरस्थ वाटू लागते. तिच्यावरचं त्याचं कथित प्रेम कापरासारखं उडून जातं. (जरी नाटकात त्याने या धक्क्य़ातून सावरल्यावर वास्तव स्वीकारायचं ठरवलेलं दाखवलंय, तरीही!) प्रियाच्या दृष्टीनं निशाची वेगळी लिंगओळख कळल्याने त्यांच्यातल्या वादाचा, प्रतारणेचा मुद्दाच संपला होता. साहजिकच हुश्श म्हणत ती रिलॅक्स्ड होते. तिची ही प्रतिक्रिया सर्वसामान्य स्त्रीसारखीच! पुढे तिने निशाला ‘समजून’ घेण्याची तयारी दाखवणं वगैरे ठीक आहे; पण मुळात ती प्रक्रिया नैसर्गिक नाही. ती सहानुभूतीतूनच उद्भवलेली आहे.

मग या नाटकात वेगळं काय आहे? तर- निशाच्या आईची अधोरेखित झालेली हतबलता! त्या हतबलतेला मिळालेला अस्फूटसा उद्गार. निशालाही तिची ही कुतरओढ कळून येणं आणि त्यातून त्या माय-लेकींचं एकत्र येणं.. निशाच्या वेदनामय आयुष्यात आशेचा एक किरण दिसू लागणं.. हे जास्त स्वाभाविक वाटतं.

लेखिका शुभा गोडबोले यांनी नाटकाची रचना बाळबोध पद्धतीनं केलेली आहे. एक पात्र प्रसंग कथन करतंय असं दाखवून नंतर तो प्रत्यक्ष घडताना दाखवणं.. या बाळबोध फॉर्मचा वापर नाटकात आहे. दिग्दर्शक राजन ताम्हाणे यांनी नाटकाच्या या रचनेचा वेगळ्या पद्धतीनं विचार करणं आवश्यक होतं. प्रिया आणि निशा यांच्यातले साचेबद्ध सवाल-जवाब हा नाटकातील बोअरिंग भाग आहे. बदललेल्या काळाची त्यात दखलच घेतलेली दिसत नाही. परिणामी हे नाटक नेमकं कुठल्या काळातलं आहे असा प्रश्न पडतो. खरं पाहता आजच्या घडीला ‘ट्रान्स जेंडर’ हा विषय अतिशय गुंतागुंतीचा आणि कमालीच्या चर्चेचा विषय आहे. या समस्येशी सामना करावा लागणाऱ्या व्यक्ती कोणत्या भयाण मनोकायिक अवस्थेतून जात असतात याचा नुसता विचार केला तरी अंगावर काटा येतो. या विषयास अधिक सखोलतेनं आणि विचारपूर्वक हात घालणं गरजेचं आहे. उत्तरार्धात नाटक या विषयाला स्पर्श करतं खरं; पण त्याच्या तळाशी जात नाही. मुळात स्त्री-पुरुष संबंधांतल्या त्रिकोणावरच बराच वेळ खर्ची पडल्यानं हा विषय उरकल्यासारखा नाटकात येतो आणि संपतो. लेखक-दिग्दर्शक दोघांनाही हे जाणीवपूर्वक टाळायला हवं होतं. राजन ताम्हाणे यांनी प्रयोग सुविहित बसवला आहे. प्रकाशयोजनाही त्यांचीच आहे. संदेश बेंद्रे यांचं नेपथ्य नाटकाची मागणी पुरवतं. प्रसंगबदलाचं नेपथ्य प्रेक्षकांसमोरच बदलण्याचं प्रयोजन आकळलं नाही. आशुतोष वाघमारे-प्रीतीश खंडागळे यांनी पाश्र्वसंगीतातून नाटय़ांतर्गत विविध मूड्स गहिरे केले आहेत.

शुभा गोडबोले यांनी वेगळी लिंगओळख असलेल्या निशा या स्त्री(?)ची घुसमट, वेदना संवादोच्चारांतील कंपनांतून, ठाशीव शब्दफेकीतून उत्तमरीत्या व्यक्त केली आहे. प्रिया या पात्राशी वैचारिक/भावनिक बांधिलकी नसताना ते साकारावं लागल्याने असेल बहुधा- प्रतिमा कुलकर्णी सतत अवघडल्यासारख्या वाटतात. प्रिया ज्या तऱ्हेनं त्रागा करते ती भाषा, तिची व्यक्त होण्याची पद्धती याच्याशी प्रतिमा कुलकर्णी (व्यक्तिश:) सहमत नसल्याने त्रयस्थ भूमिका वठवताहेत असं वाटत राहतं. दीपक करंजीकरांचा आदित्यही असाच सतत अवघडलेपण घेऊन वावरणारा. कंपनीने अचानक सीएसआरची जबाबदारी दिल्यावर आदित्यने मोडून पडण्याइतकं खरं तर काय झालं होतं? आदित्यचं निराश होणं, अपमानास्पद वाटणं एक वेळ समजून घेता येईल; पण आकाश कोसळण्याइतकी ही गोष्ट खचितच भयंकर नाही. असो. परंतु त्यांच्या या नैराश्यग्रस्त काळात त्यांच्यात व निशात फुलत जाणारं नातं अलवारपणे उमलत जायला हवं होतं. त्याचे पदर हळुवारपणे उलगडत जायला हवे होते. पण तसं घडत नाही. अर्थात यातली पात्रं साकारणाऱ्या दीपक करंजीकर व प्रतिमा कुलकर्णी यांना दोष देता येणार नाही. तो संहितेचा दोष आहे. तसंच हे लेखकाच्या निदर्शनास न आणून देणाऱ्या दिग्दर्शकाचाही! असो. असं असलं तरी एका वेगळ्या विषयाला हात घालणारं नाटक म्हणून ‘ट्रान्स अफेअर’ दखलपात्र आहे.