कलाकारांच्या आयुष्यात सर्वाधिक महत्त्व कोणत्या गोष्टीला असेल तर ते म्हणजे त्यांचे चाहते. कोणताही कलाकार आपल्या कलेच्या बळावर स्वत:ची ओळख प्रस्थापित करतो, अर्थार्जनही करतो. पण, या साऱ्यामध्ये चाहत्यांकडून मिळणारं प्रेम आणि त्यांच्या मनात असणारं आपलं स्थान हीच कलाकारांची खरी संपत्ती असते असं म्हणायला हरकत नाही. चाहत्यांच्या प्रेमातच मोठ्या झालेल्या अशाच एका चेहऱ्याचं नाव आहे, श्रीदेवी. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावर चाहत्यांनी सुरुवातीपासूनच प्रेमाचा, आपुलकीचा वर्षाव केला.

फेब्रुवारी महिन्यात श्रीदेवी यांनी जगाचा निरोप घेतला. असं असलं तरीही चित्रपट आणि असंख्य आठवणींच्या माध्यमातून त्यांचा वावर आजही आपल्यात आहे, अशीच त्यांच्या चाहत्यांची भावना आहे. अशाच तीन चाहत्यांना चक्क श्रीदेवी यांच्या घरुन बोलावणं आलं होतं. ज्यानंतर खुद्द बोनी कपूर यांनीही त्या तरुणींची भेट घेतली. ज्यामुळे त्यांचा आनंद ओसंडून वाहत असल्याचं पाहायला मिळालं. सोशल मीडियावरही या चाहत्यांची चर्चा झाली. पुण्याच्या या तरुणी सध्याच्या घडीला ‘मिस हवाहवाई”च्या सुपरफॅन ठरत आहेत. परिधी भाटी (२६), भावना वर्मा (३३) आणि तोनू सोजातिया (२९) या तिघींनी होंडा सिटी या कारला असा काही हटके लूक दिला आहे, जो पाहून रस्त्याने जाणारा प्रत्येकजण या कारकडे वळून पाहत आहे. ही कार श्रीदेवी यांच्या तीन चाहत्यांनी मिळून अशा पद्धतीने डिझाईन केली आहे, की अवघ्या काही सेकंदांच्या दृष्टीक्षेपातच बॉलिवूडच्या ‘चाँदनी’चा प्रवास तुमच्या डोळ्यांपुढे उभा राहिल.

वाचा : ‘who added whom first?’- फेसबुकने जुळवलेल्या एका लग्नाची गोष्ट

आपल्या या अनोख्या संकल्पनेविषयी ‘आयएएनएस’ या वृत्तसंस्थेशी संवाद साधत तोनू सोजातिया म्हणाली, ‘कारवर लावण्यासाठी खास पद्धतीचे डिझाईन्स आम्ही तयार केले. जे दीर्घकाळ टीकणारे असतील. ज्यानंतर साधारण महिनाभर आम्ही या कारचा लूक बदलण्यावर काम केलं. हजारो मनांवर आजही राज्य करणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावरील प्रेमापोटीच आम्ही हे केलं.’ या कारवर श्रीदेवी यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात झाल्यापासूनचे काही फोटो, त्यांच्या चित्रपटातील संवाद आणि विविध रुपात चमकणाऱ्या या ‘चाँदनी’च्या अदांची झलक पाहायला मिळते. ‘लम्हे’, ‘चाँदनी’ आणि ‘मॉम’ या चित्रपटांवरही या अनोख्या कारच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला आहे.