18 February 2019

News Flash

अमरापूरकर : एक पुस्तकवेडा कलाकार

सदाशिव अमरापूरकर यांचा ३ नोव्हेंबर हा स्मृतिदिन. त्यानिमित्ताने..

सिने आणि नाटय़सृष्टीतील ज्येष्ठ कलाकार सदाशिव अमरापूरकर यांचा ३ नोव्हेंबर हा स्मृतिदिन. त्यानिमित्ताने..

आयुष्यात काही योग का येतात, त्यामागे काय कारणं असतात, याचं स्पष्टीकरण नेहमी देता येतंच असं नाही. सदाशिव अमरापूरकरांचा स्नेह हा आमच्या जीवनातला एक असाच टप्पा होता.

अमरापूरकर हे अनिल अवचटांचे जवळचे मित्र. अवचटांमुळे आमचा त्यांच्याशी परिचय झाला. आम्ही दोघं आणि अवचट नियमितपणे विद्यापीठात फिरायला जायचो. तेव्हा काही निमित्तानं पुण्यात आलेले अमरापूरकरही आमच्याबरोबर फिरायला आले.

चित्रपट क्षेत्रातला एखादा माणूस जवळून पाहायचा माझ्या आयुष्यातला तो पहिलाच प्रसंग! साहजिकच त्यांनी रंगवलेले सगळे खलनायक डोळ्यांसमोरून तरळून गेले. मी अमिताभ बच्चन युगातली असल्यामुळे कुठल्याशा एका चित्रपटात अमरापूरकरांनी रंगवलेल्या व्हीलनला नष्ट करण्यासाठी दोन अमिताभ बच्चनना जन्म घ्यावा लागल्याचंही आठवलं! बाप आणि मुलगा! सगळं आठवल्यावर समोरच्या साध्या, तुमच्या-आमच्यासारख्या कुठल्याही घरात सामावून जाईल अशा सदाशिव अमरापूरकर नावाच्या माणसाला पाहून मला गंमत वाटत राहिली.

मग ते अनेकदा फिरायला येऊ लागले. विद्यापीठात फिरताना गमतीशीर अनुभव येई. आम्ही ग्राउंडच्या कडेनं फिरत असताना ग्राउंडवर फुटबॉलचा खेळ सुरू असे. त्यातल्या गोलीचं आमच्याकडे लक्ष जाई. त्याला अमरापूरकरांची ओळख पटली की तो बावचळल्यासारखा होई. पुढच्या फेरीपर्यंत समस्त खेळाडू तिकडे जमा होत आणि नुसतेच पाहत राहत. त्यातला एखादा स्मार्ट तरुण मात्र पुढे येऊन त्यांच्या काही सिनेमांची आठवण काढे. पुन्हा त्यांचा खेळ सुरू होई.

याचा प्रभाव नंतरही काही दिवस दिसे. आमच्याबरोबर कुणीही चौथं माणूस दिसलं की त्यांचा खेळ मंद होई. निराशा झाली की पुन्हा खेळ जोरात सुरू होई. ते घरी येऊन गेले की कॉलनीतले लोक चौकशी करत. काही जण ती संधी धरून त्यांच्याशीही दोन वाक्यं बोलून आनंद मानत.

सगळं कुटुंब जवळ आल्यावर गप्पांमध्ये कौटुंबिक विषयही येऊ लागले. पत्नी आणि मुलींविषयी ते अदबीनं बोलू लागले की अवचट आणि आम्ही त्यांची चेष्टा करू लागलो. ‘एवढा व्हिलनोत्तम! पण घरातल्या चार बायकांना कसे दबून राहतात?’ ही चेष्टा तेही मोठय़ानं हसून स्वीकारत.

पण लवकरच एका हिंदीतल्या या प्रख्यात चित्रपट अभिनेत्याबरोबरच त्यांच्यातल्या पुस्तकवेडय़ा माणसाचा परिचय होऊ लागला. ते पुण्यात असतील तेव्हा बऱ्याच वेळा नाश्त्याला भेटणं आणि सकाळच्या फ्रेश वातावरणात गप्पा मारणं सुरू झालं. गप्पांना कुठलेही विषय चालत होते. पुस्तकांचा, आमच्या सुरू असलेल्या लेखनाचा विषय असेच. परंतु त्यांच्या सिनेमांचा विषय मात्र त्यात कधीच निघायचा नाही.

एकदा त्यांनी आम्हाला अहिल्याबाई होळकरांच्या जीवनावरच्या चित्रपटाच्या शूटिंगलाही नेलं होतं. एकदा त्यांची मुलाखत घ्यायलाही त्यांनी मला मुख्य मुलाखतकर्त्यांबरोबर बसवल्याचंही आठवतं. त्यांच्याबरोबर नंदाताईही पुढे ओळखीच्या झाल्या. नंतर त्या लेखनकार्यात वळल्या आणि मैत्रीणच झाल्या. तसेच रीमाचंही झालं. हळूहळू संपूर्ण अमरापूरकर परिवार आमचा मित्र झाला.

एकदा त्यांनी आपल्या कुटुंबासमवेत आम्हालाही एका हॉटेलमध्ये जेवायला नेलं. साहजिकच त्यांच्या चाहत्यांचा त्यांच्याभोवती गराडा पडला. तेव्हा नंदाताई म्हणाल्या, ‘यांच्याबरोबर हॉटेलात गेलं की असंच घडतं. सगळे वेटर्स त्यांना हजार वेळा पाणी विचारतील! पण शेजारी असलेल्या आपल्याला तहानेनं जीव व्याकूळ झाला असला, तरी पाणी देणार नाहीत!’ यावर आम्ही सगळेच भरपूर हसलो. कारण प्रात्यक्षिक समोरच चाललं होतं ना!

तसेच अनिल अवचटांच्या ऑपरेशनच्या वेळी ते भेटायला आले. तेव्हा सफाई कामगारांनी त्या खोलीची सफाई चार-चार वेळा केली! शिवाय बाहेर डॉक्टरांचा घोळका जमला आणि शेजारपाजारच्या फ्लॅटच्या खिडक्या आणि बाल्कन्या भरून गेल्या.

हळूहळू अवचट नसतानाही त्यांची-आमची भेट होऊ लागली आणि त्यातून विविध विषयांची चर्चा होऊ लागली. नंदाताई मोठय़ा जोमानं अनुवाद क्षेत्रात उतरल्यावर तर या कुटुंबाशी आणखी जवळचं नातं जडलं. एका दिवाळीत नरक चतुर्दशीच्या दिवशी अतिशय छान अशी सकाळ आम्ही दोन्ही कुटुंबांनी एकत्र घालवल्याची खूप छान आठवण आहे.

एखाद्याला आपलं मानलं, की त्या संपूर्ण कुटुंबालाच आपलं मानण्याच्या त्यांच्या स्वभावाचा प्रत्यय आम्हाला लवकरच आला. एकदा ते बेळगाववरून पुढे कुठल्यातरी गावाला जाणार होते. त्या वेळी त्यांनी आवर्जून माझ्या माहेरचा पत्ता आणि फोन नंबर घेतला आणि माझ्या घरी जाऊन आले. माझी भावंडं काही सिनेमा क्षेत्राची फारशी शौकीन नाहीत. तरीही त्यांना अमरापूरकरांचा साधा स्वभाव अतिशय भावला.

अमरापूरकरांच्या पुस्तकप्रेमाविषयी मला ठाऊक होतं. त्यामुळे प्रकाशित झालेलं पुस्तक त्यांना द्यायची पद्धत सुरू झाली. त्या शिवाय त्यांच्या संग्रहात कन्नडमधल्या कादंबऱ्यांचे अनेक अनुवाद असायचे. कर्नाटकात गेले तर तिथल्या लेखकांना भेटण्यातही त्यांना रस असायचा. एकदा भैरप्पांशीही त्यांची आमच्या घरी भेट झाल्याचं आठवतं. त्यांच्याच आग्रहाखातर मी शिवराम कारंतांवर एक सविस्तर लेख लिहिला आणि तो एका दर्जेदार दिवाळी अंकात प्रकाशित होईल हे त्यांनी जातीनं पाहिलं.

अगदी अलिकडे त्यांच्या नगरच्या घरात मी त्यांच्या उबदार अभ्यासिकेबरोबरच त्यांचा पुस्तकांचा संग्रह पाहिला आणि अवाक् झाले. अक्षरश: हजारो पुस्तकं होती तिथं. त्यात ज्ञानकोशांचे खंड, रामायण, महाभारत, पुराणं, इंग्लिश पुस्तकं, चित्रकला आणि इतर कलांवरची इंग्रजी आणि मराठी पुस्तकं, जुन्या मासिकांचे गठ्ठे तसेच जुन्या-नव्या लेखकांच्या कादंबऱ्या मांडून ठेवलेल्या दिसत होत्या. रीमा तर सांगत होती, ‘हा एकूण पुस्तकांच्या संग्रहाचा थोडासा भाग आहे! आमच्या प्रत्येक घरात अशीच पुस्तकं ठेवलेली आहेत. बाबा कुठल्याही घरी असले तरी त्यांना हाताशी पुस्तक लागतंच.’

ओळख झाल्यावर मी एकदा अमरापूरकरांना विचारलं होतं, ‘तुमचं एवढं बिझी शेडय़ूल असतं, त्यात वाचायला कुठला वेळ मिळतो?’ त्यावर त्यांनी सांगितलं होतं, ‘हे खोटं आहे! खूप वेळ असतो. बहुतेक वेळा शूटिंगचं सगळं शेडय़ूल ठरलेलं असतं. सगळे तयार असतात, पण मुख्य कलाकाराचा पत्ताच नसतो. तो आपल्या वेळेनुसार येतो. तो वाट बघायचा कालखंड अतिशय मनस्तापाचा असतो. तो मनस्ताप ही पुस्तकं दूर करतात. परगावी शूटिंग असेल तर मग वेळच वेळ!’

त्यांच्या पुस्तकप्रेमाचा प्रत्यय त्यांच्या मुलीच्या – केतकीच्या लग्नाच्या वेळी आला. तेव्हा लग्नातलं पाहुण्यांचं मानपानही पुस्तकांच्या देवाणघेवाणीतून राखला होता. तेव्हा तर मी आश्चर्याने अवाक् झाले होते. (थोरल्या मुलीचं – सायलीचं लग्न मात्र नगरला भलत्याच थाटामाटात झालं.)

अखेरचे सहा-सात महिने त्यांच्या आजारपणाच्या बातम्या रीमाकडून समजत होत्या. तरीही एवढय़ा झटपट सगळं आवरेल असं वाटलं नव्हतं. पण हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलो तेव्हा मात्र परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलं.

ते गेल्याचं समजताच कोल्हापूरहून अरुण नाईकांचा फोन आला. तेही अमरापूरकरांशी पुस्तकांनीच बांधले गेले होते. अर्थातच अमरापूरकरांचं पुस्तकप्रेम हाच बोलण्यातला विषय होता.

आजही जेव्हा रीमा किंवा नंदाताईंशी बोलताना अमरापूरकरांच्या आठवणी निघतात, तेव्हा त्यांचा साधा, स्वत:वर विनोद करून खळखळून हसणारा चेहरा नजरेसमोरून हलायला तयार नसतो.

वाटतं, हे काही जायचं वय नव्हतं त्यांचं!

First Published on November 5, 2017 12:57 am

Web Title: tribute to indian actor sadashiv amrapurkar