‘दंगल’ चित्रपटामुळे प्रसिद्धीस आलेली बाल कलाकार झायरा वसिम आता वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांची भेट घेतल्यानंतर झायराने फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून माफी मागणारे पोस्ट शेअर केले आहे. या भेटीनंतर झायराची सोशल मिडीयावरही खिल्ली उडवली जात होती. त्यानंतर तिने माफीची एक पोस्ट शेअर करण्याचा निर्णय घेतला.

झायराने पोस्टमध्ये लिहिले की, हा एक खुला माफीनामा आहे. गेल्या काही दिवसात मी काही व्यक्तिंना भेटल्यामुळे काही लोकांची मने दुखावली आहेत. ज्या व्यक्ती नकळत दुखावल्या गेल्या आहेत त्यांची मी माफी मागते. गेल्या सहा महिन्यात जे काही घडले आहे ते पाहता मी लोकांच्या भावना समजू शकते. पण ब-याचदा परिस्थितीपुढे तुमचे काही चालत नाही याची लोकांनाही जाण आहे. लोकांना हेही माहित आहे की, मी केवळ १६ वर्षांची आहे आणि त्यानुसार तुम्ही मला वागणूक द्याल अशी मी आशा करते. मी जे काही केले त्यासाठी माफी मागते. मात्र, हे मी जाणूनबुजून केलेले नाही आणि यासाठी लोक मला कदाचित माफ करतील. माझ्यासाठी आणखी काही गोष्टी खूप महत्त्वाच्या असून त्या मला येथे स्पष्ट करायच्या आहेत. काश्मीरी युवापिढीसमोर मला रोल मॉडेल म्हणून सादर केले जात आहे. पण मी हे स्पष्ट करू इच्छिते की, मी जे काही करतेय त्याचा मला अभिमान आहे. पण कुणीही माझ्या पावलावर पाऊल टाकत मला रोल मॉडेल समजावे असे मला अजिबात वाटत नाही. इतिहासात आणि आताच्या क्षणालाही रोल मॉडेल अशा ब-याच व्यक्ती आहेत. त्यामुळे मला रोल मॉडेल समजणे म्हणजे त्यांचा अपमान करण्यासारखे आहे. मला येथे कोणताही वाद करण्याची इच्छा नसून केवळ तुमच्याशी काहीतरी बोलण्याची इच्छा होती.

zaira-twitter

झायराच्या या पोस्टनंतर ट्विटरवरील तिच्या फोलोअर्सकडून तिला पाठिंबा मिळत आहे. तिच्या या माफिनाम्यावर प्रतिक्रिया येत आहेत. तुला माफी का मागावीशी वाटतेय? विविध माणसं जोडली जातील अशा प्रकारचे तू काम केले आहेस. प्रत्येक कश्मिरी नागरिकाला तुझा अभिमान वाटतोय…. तरुणांसाठी तू खरंच प्रेरणादायी आहेस, खासकरुन मुलींसाठी…. तू महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देत आहेस. लोकांना आनंदी ठेवणं ही जगातील सर्वात कठीण गोष्ट असते. पण, तू ते खूप सहजरित्या केले आहेस. त्यामुळे अजिबात माफी मागू नकोस. तू एक चॅम्पियन आहेस. #champion या हॅशटॅगसह या सर्व प्रतिक्रिया तिच्या पोस्टवर उमटत आहेत.

zaira-wasim-khan-apology1

zaira-wasim-khan-apology2