मराठी भाषेबद्दल ओरड करणाऱ्यांनी तोच पैसा आपले दर्जेदार मराठी चित्रपट देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे खडे बोल मूळ तमिळ आणि गेल्या काही वर्षांत हिंदी चित्रपट दिग्दर्शक म्हणून लौकिक मिळवणाऱ्या आर. बाल्की यांनी मराठीवरून राजकारण करणाऱ्यांना सुनावले. सध्या देशात चांगला सिनेमा हा मराठी भाषेतच पाहायला मिळतो, असे मत व्यक्त करत मराठी चित्रपट जगभरात पोहोचले पाहिजेत, असा आग्रही मुद्दा आर. बाल्की यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना मांडला.
हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांना बाजूला सारून मी मराठी चित्रपटांना महत्त्व देतो, असे सांगणाऱ्या बाल्की यांनी आपण मराठी चित्रपटांचा निस्सीम चाहता असल्याचे सांगितले. मी ‘टिंग्या’, ‘गाभ्रीचा पाऊस’ ते हल्ली प्रदर्शित झालेल्या ‘नटसम्राट’पर्यंत सगळे मराठी चित्रपट पाहिले आहेत. ‘बालगंधर्व’ हा चित्रपट तर मी अमेरिकेत पाहिला आहे. काही कामानिमित्त तिथे असताना ‘बालगंधर्व’ लागल्याची माहिती मिळताच वेळात वेळ काढून तो चित्रपट पाहिला होता, अशी आठवण बाल्की यांनी सांगितली. मी नेहमी आवर्जून मराठी चित्रपट पाहतो. दिग्दर्शकोंमध्ये उमेश कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी, रवी जाधव यांचे चित्रपट सातत्याने पाहिले आहेत, असेही ते पुढे म्हणाले. आशय आणि मांडणीच्या दृष्टीने देशभरातील कोणत्याही चित्रपटांपेक्षा मराठी चित्रपट सरस आहेत, मात्र गमतीचा भाग असा आहे की मराठी भाषेच्या नावाने ओरड करणाऱ्यांना आपल्याकडे किती चांगले माध्यम आहे, याची जाणीवच नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मराठी नावाच्या पाटय़ा लागल्या पाहिजेत, मराठीच बोलली गेली पाहिजे म्हणून मोर्चे काढणाऱ्यांना मराठी चित्रपट यासंदर्भात किती मोलाची भूमिका निभावू शकतात हेच माहिती नाही. हा खूप मोठा विरोधाभास आहे. मराठी चित्रपट हे संपूर्ण देशात पाहिले जावेत, यासाठी त्यांची प्रसिद्धी, मार्केटिंग या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मोर्चे आणि इतर गोष्टींमध्ये जो पैसा जातो आहे तो मराठी चित्रपट जगभरात पोहोचवण्यासाठी लावला तर ते जास्त फायदेशीर ठरेल. दिग्दर्शक किंवा निर्माता या भूमिकेतून आपण मराठी चित्रपटांकडे पाहू शकत नाही. माझ्या चित्रपटांच्या कथा मी लिहितो. मराठी माझी भाषा नसल्याने तितक्या प्रभावीपणे मराठी चित्रपटासाठीच्या कथा-कल्पना कागदावर उतरवणे मला शक्य होत नाही. मात्र, इतर कोणत्याही भाषिक चित्रपटांपेक्षा मराठी चित्रपट हा नावीन्यपूर्ण कल्पना, आशय याबाबतीत दर्जेदार असतो.
आर. बाल्की