बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि तिची बहीण रंगोली चांडेल विरोधात मुंबईच्या वांद्रे पोलीस ठाण्यात एफआयआर  नोंदवण्यात आली होती. १२४ अ सह विविध कलमांतर्गत कंगना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावरून कंगणाने न्यायव्यवस्थे विरोधातही द्वेषपूर्ण आणि अवमान करणारे ट्वीट करत टीका केली होती. त्यानंतर मुंबईत्या एका वकिलाने कंगनाविरोधात गुरुवारी अंधेरी महानगर दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती.

कंगनाने आपल्या ट्विटद्वारे दोन समुदायांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. कंगनाला देशातील विविध समुदाय, कायदा आणि सरकारी यंत्रणांबाबत अजिबात आदर नाही. तिने आपल्या ट्विटद्वारे न्यायालयाचीही खिल्ली उडवली आहे, असे या वकिलाने आपल्या तक्रारीत म्हटले होते. पुन्हा आता कंगनाने तीच्यावर केलेल्या आरोपांवरून ट्विटरवरून टीका केली आहे.

कंगनाने कॅंडल मार्च गॅंग आणि अवॉर्ड वापसी गॅंगवर ही जोरदार टीका केली आहे. कंगनाने एकापाठोपाठ एक ट्विट करत वीर सावरकर, राणी लक्ष्मीबाई आणि नेताजी सुभाष चंद्र बोस यांची नावे घेत आपण तुरूंगात जायला तयार आहोत असेही म्हटले आहे. ‘मी वीर सावरकर, राणी लक्ष्मीबाई आणि नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या सारख्या लोकांची पूजा करते. आज हे सरकार मला तुरूंगात टाकण्याचा प्रयत्न करत आहे आणि यामुळे मला माझ्या निर्णयावर गर्व आहे. लवकरच तुरूंगात जाण्याची वाट पाहत आहे. माझ्या आदर्शांनी जो त्रास सहन केला तो त्रास सहन करण्याची वाट पाहत आहे,’ असे कंगनाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

“जसे राणी लक्ष्मीबाई यांचा किल्ला पाडण्यात आला, वीर सावरकारांना बंडसाठी तुरूंगात टाकण्यात आले त्याप्रमाणे मलाही तुरूगांत टाकण्याचे पूर्ण प्रयत्न करण्यात येत आहेत. असहिष्णुतावाद्यांना जावून विचारा किती कष्ट सहन केले आहेत या असहिष्णुतावादी देशात,” असा सवाल कंगनाने दुसऱ्या ट्विटमध्ये केला आहे. कंगनाने या ट्विटमध्ये अभिनेता आमिर खानला टॅग केले आहे.