बॉलिवूडचा ‘दबंग’ अभिनेता सलमान खान याच्या आगामी ‘ट्युबलाइट’ चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून सलमान हा दिग्दर्शक कबीर खानसोबत तिस-यांदा काम करताना दिसणार आहे. चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यापूर्वी सलमानने ट्विटरवर चित्रपटाचे पाच वेगवेगळे पोस्टर ट्विट केले होते. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये टिझरबद्दलची उत्सुकता आणखीनच शिगेला पोहोचली होती. अखेर गुरुवारी ‘ट्युबलाइट’चा अधिकृत टिझर प्रदर्शित करण्यात आला. पण तुम्हाला ठाऊक आहे का?, ‘ट्युबलाइट’चा टिझर  एका हॉलिवूड चित्रपटाची कॉपी आहे.

‘ट्युबलाइट’ आणि २०१५ साली आलेल्या ‘लिटिल बॉय’ या  हॉलिवूडपटाची कथा मिळती-जुळती आहे. या दोन्ही चित्रपटांमध्ये फक्त एक फरक आहे तो म्हणजे , ‘ट्युबलाइट’मध्ये सलमान ५० वर्षांचा असून ‘लिटिल बॉय’मध्ये एका आठ वर्षांच्या मुलाची कथा दाखवली गेली आहे. ‘लिटिल बॉय’ चित्रपटाची कथा दुसऱ्या महायुद्धावर आधारित आहे. वडिलांवर अतोनात प्रेम करणाऱ्या आठ वर्षीय मुलाचे बाबा दुसऱ्या महायुद्धात शत्रूंशी दोन हात करण्यासाठी जातात. त्यादरम्यान सैनिक असलेल्या त्याच्या वडिलांना बंदी बनवले जाते आणि मग हा लिटिल बॉय त्याच्या समोर आलेल्या आव्हानांचा सामना करत वडिलांना शोधण्यासाठी बाहेर पडतो.

salman-khan-tubelight-33

सलमानच्या ‘ट्युबलाइट’ची कथासुद्धा काहीशी अशीच आहे. केवळ यात वडील आणि मुलगा याऐवजी दोन भावांमधील भावनिक नाते दाखविण्यात आले आहे. चित्रपटात लहान मुलाऐवजी सलमानने भूमिका साकारली असून तो गतिमंद दाखविण्यात आला आहे. तर, वडिलांऐवजी यात सोहेलने भावाची भूमिका वठवलीय. चित्रपटाध्ये सैनिक असलेला सोहेल युद्धासाठी गेल्यानंतर सलमान पूर्णपणे बिथरतो, असे चित्रीत करण्यात आले आहे.

salman-khan-tubelight-3

बादशहा शाहरुख खान ‘ट्युबलाइट’मध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याने यात बेन चॅपलिनची भूमिका साकारलीय. हॉलिवूडची कॉपी असूनही सलमानचा ‘ट्युबलाइट’ चाहत्यांवर छाप पाडण्यात यशस्वी ठरतो का ते चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल.