बऱ्याच चर्चा, ट्विटर ट्रेंडमध्ये आल्यानंतर अभिनेता सलमान खानची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘ट्युबलाइट’ Tubelight या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटाच्या पहिल्या लूकपासूनच बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. चिनी अभिनेत्री झू झूसुद्धा या चित्रपटाच्या चर्चेत येण्यामागचं एक कारण होतं. त्यामुळे यंदाच्या ईदला भाईजानची ईदी कोणत्या स्वरुपात मिळणार याचीच उत्सुकता लागून राहिलेली असताना या ईदीची हलकीशी झलक ट्रेलरमधून पाहायला मिळते आहे.

‘रामायणा’तील पात्र आणि त्यांच्यातील नात्यांचा आधार घेत कबीरने ‘भरत’- आणि ‘लक्ष्मण’ या दोन भावांच्या नात्याभोवती हा चित्रपट गुंफला आहे हे ट्रेलर पाहताना लक्षात येतंय. भावांचं प्रेम कोणत्या पातळीपर्यंत जाऊ शकतं याचं सुरेख चित्रण यात करण्यात आलं असून, छायाचित्रकाराची किमयाही दाद मिळवून जाते. मुख्य म्हणजे रिअल लाइफमध्ये सख्खे भाऊ असणारे सलमान आणि सोहेल Salman Khan and sohail khan यांच्यातल्या नात्यातील सहजतेमुळे दृश्यं आणखीनच प्रभावी वाटताहेत. त्यामुळे या भावांची केमिस्ट्री ‘ट्युबलाइट’ची जमेची बाजू ठरू शकते. सलमानच्या चेहऱ्यावरील सोज्वळ भाव पाहताना ‘बजरंगी भाईजान’मधील ‘पवन कुमार चतुर्वेदी’ही आठवल्यावाचून राहात नाही. त्यासोबतच दिवंगत अभिनेते ओम पुरी यांचीही झलक पाहायला मिळत असल्यामुळे त्यांच्या कलाकृतीतून ते आजही आपल्यात असल्याची अनुभूती होते. त्याशिवाय या डोळ्यात पाणी आणणाऱ्या या ट्रेलरमध्ये किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खानचीही झलक पाहायला मिळत आहे.

वाचा: Tubelight Trailer Review : … अखेर ‘ट्युबलाइट’ पेटली…
दबंग खानची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटामध्ये १९६० च्या दशकातील काळ साकारण्यासाठी कबीरने बरीच मेहनत घेतली असून, चित्रपटातील बहुतांश दृश्यांचं चित्रीकरण लेह- लडाखमध्ये करण्यात आलं आहे. दरम्यान, ट्रेलर प्रदर्शित करण्यापूर्वी एका सोहळ्यामध्ये सलमान खान, सोहेल खान, दिग्दर्शक कबीर खान आणि संगीतकार प्रितम यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधिंच्या प्रश्नांना उत्तरं देत चित्रपटाबद्दलची बरीच माहिती दिली. यावेळी सलमानने चित्रपटात काम करण्यासंबंधीचा त्याचा अनुभवही शेअर केला. माध्यमांसोबत नेहमीच खेळीमेळीने वागणाऱ्या सलमानने यावेळी ‘आम्ही कदाचित ‘ट्युबलाइट’चा सिक्वल म्हणून ‘एलईडी’ काढू’, असं म्हणत मार्मिक टिप्पणीही केली. ‘ट्युबलाइट’चा ट्रेलर, चित्रपटाचं पार्श्वसंगीत, सलमानचा अभिनय आणि कबीर खानचं दिग्दर्शन यांची सुरेख घडी बसल्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कसं प्रदर्शन करतो याची गणितं आतापासूनच मांडण्यास सुरुवात झाली आहे.