अभिनेता-निर्माता स्वप्निल मुनोत याने मनोरंजनसृष्टीत पुन्हा एकदा आपला ठसा उमटविला आहे. त्याची झी युवा वरील ‘तुझं माझं जमतंय’ ही मालिका अगदी पहिल्या दिवसापासून चर्चेत राहिली आहे. नुकतेच या मालिकेने त्यांचे ५० एपिसोड पूर्ण केले असून केवळ ५० भागांतच या मालिकेने झी युवावर ५० भागांत प्रथम क्रमांक मिळविला आहे. स्वप्निल आणि त्यांच्या टीमने या यशाचे सेलिब्रेशन केलं.

‘तुझं माझं जमतंय’ ही हलकी- फुलकी, दिलदार रोमँटिक कॉमेडी मालिका आहे. ही मालिका अश्विनी आणि शुभंकर यांच्या प्रेमकथेभोवती फिरत आहे. यामध्ये रोशन विचारे आणि मोनिका बागुल यांच्या प्रमुख भूमिका आहेत, तर अपूर्वा नेमळेकर यामध्ये ‘पम्मी’ नावाची सुंदर आणि दिलखेचक भूमिका साकारतेय. प्रेक्षक देखील या मनोरंजक कथानक असलेल्या मालिकेचा मनसोक्त आनंद घेत आहेत.

आणखी वाचा- ‘मुळशी पॅटर्न’च्या यशानंतर पुनीत बालन स्टुडिओज घेऊन येत आहे ‘जग्गु आणि Juliet’

बालकलाकार म्हणून वयाच्या पाचव्या वर्षी स्वप्निल मुनोतने अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. बालनाट्यांमध्ये दमदार काम करत त्याने काही पुरस्कारसुद्धा जिंकले. महाविद्यालयात नाटक स्पर्धेत सहभाग व राज्यस्तरीय एकांकिकेत भाग घेत त्याने हा प्रवास सुरु ठेवला. त्यानंतर केदार शिंदेंच्या ‘खो खो’ या चित्रपटात अभिनयाची संधी मिळाली. अभिनयापासून सुरु केलेला हा यशस्वी प्रवास आता निर्मात्यापर्यंत येऊन पोहोचला.

आणखी वाचा- ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत मनोरंजनातून प्रबोधन

स्वप्नील ‘अग्गंबाई अरेच्चा २’ या मराठी चित्रपटाच्या निर्मात्या टीमचा एक भाग झाला आणि त्याचसोबत छोटीशी भूमिकासुद्धा साकारली. इथूनच निर्मितीबद्दलची आवड हळूहळू वाढत गेली आणि त्यानंतर अंकुश चौधरी, शिवानी सुर्वे आणि पल्लवी पाटील यांच्या मुख्य भूमिका असलेला ट्रिपल सीट हा वैयक्तिक प्रकल्प म्हणून त्याने पहिला चित्रपट तयार केला.