‘शिप ऑफ थिसियस’ या चित्रपटातून आपली नवी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेता सोहम शाहचा एक अनोखा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘तुंबाड’ असं या चित्रपटाचं नाव असून त्याचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. आनंद एल राय निर्मित या चित्रपटाचा टीझर अंगावर रोमांच उभा करणार आहे.

पृथ्वीच्या गर्भातून १६ कोटी देव- देवतांनी जन्म घेतला. पण पृथ्वी देवीचे आपल्या पहिल्या संततीवर सर्वाधिक प्रेम होतं. अनेक युगांपासून तो पृथ्वी देवीच्या कुशीत झोपून राहिला. पण एकेदिवशी त्याला आपल्या पूर्वजांनी चिरनिद्रेतून जागं केलं. कारण त्याचा शाप आपल्यासाठी वरदान होता, अशी कथा या टीझरमधून सांगण्यात येत आहे. ‘तुंबाड’ची कथा ही १९२०च्या काळाताली आहे. पुण्यातील एका प्रतिष्ठित बाह्मण कुटुंबाच्या तीन पिढ्यांच्या अवती- भवती फिरणारी ही कथा आहे. त्यामुळे एकंदरीत या थरारपटाच्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच वाढवली आहे.

वाचा : अर्शद वारसीचं ट्विटर अकाऊंट हॅक 

या चित्रपटाचं दिग्दर्शन राही अनिल बर्वेनं केलं आहे. यात सोहम शाहसोबत ज्योती माळे, अनिता दाते, दीपक दामले आणि रंजिनी चक्रवर्ती यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाची बहुतांश शूटिंग ही महाराष्ट्रातच झाली आहे. महाराष्ट्राशी चित्रपटाच्या कथेचा संबंध असल्याने १२ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट हिंदी आणि मराठीत प्रदर्शित होणार आहे.