17 December 2018

News Flash

VIDEO : वजनाचा प्रश्न विचारताच विद्याचा पारा चढला

त्याने हा प्रश्न विचारताच विद्या म्हणाली....

विद्या बालन

अभिनेत्री विद्या बालन नेहमीच चौकटीबाहेरील कथानकाच्या चित्रपटांवर भर देते. अगदी ‘डर्टी पिक्चर’पासून ते ‘बेगम जान’पर्यंत प्रत्येक चित्रपटातून विद्या नवनवीन भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. आपल्या अभिनयाचे विविध पैलू दाखवणारी ही अभिनेत्री आता ‘तुम्हारी सुलू’ या चित्रपटातून पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसरवर राज्य करण्यासाठी सज्ज झाली आहे. १७ नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या प्रसिद्धीला काही दिवसांपूर्वीच जोरदार सुरुवात झाली असून, चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विद्या आणि ‘तुम्हारी सुलू’ची टीम विविध कार्यक्रमांना हजेरी लावते आहे.

अशाच एका कार्यक्रमासाठी पोहोचलेल्या विद्याला माध्यमांच्या एका विचित्र प्रश्नाला सामोरे जावे लागले. माध्यमांच्या गर्दीत एका प्रतिनिधीने विद्याला विचित्र प्रश्न विचारला. तू बऱ्याच काळापासून महिलाप्रधान चित्रपट करण्याला प्राधान्य देते आहेस. पण, येत्या काळात तू ही चौकट मोडत ‘ग्लॅमरस’ भूमिका साकारशील का?, असा प्रश्न त्याने विचारला. याच प्रश्नाला जोड देत त्या प्रतिनिधीने विद्याला विचारले, तू वजन कमी करण्याच्या विचारात आहेस का? तो प्रश्न ऐकताच विद्याच्या चेहऱ्यावर राग स्पष्टपणे पाहायला मिळत होता.

सार्वजनिक ठिकाणी, कार्यक्रमांमध्ये चिडून काहीच उपयोग नसल्यामुळे विद्याने अगदी समजुतदारपणे या प्रश्नाचे उत्तर दिले. ‘तुम्ही विचारलेल्या दोन्ही प्रश्नांचा परस्परांशी काहीच संबंध नाही. कारण, मी जे काम करते आहे, त्यात मला आनंद मिळतोय. त्यामुळे आता एखाद्या व्यक्तीकडे पाहण्याचा तुमचा दृष्टीकोन बदलण्याचीच गरज आहे’, असे विद्या म्हणाली. अतिशय थेट आणि सूचक शब्दांमध्ये त्या प्रश्नाचे उत्तर देत विद्याने तो प्रसंग सांभाळून घेतला.

वाचा : बॉलिवूडमध्येही लैंगिक छळ होतो- प्रियांका चोप्रा

एकीकडे बॉलिवूडमध्ये ‘झिरो फिगर’चा ट्रेंड जोरात असतानाच विद्या बालन मात्र या ट्रेंडचा भाग झाली नाही. आपल्या वाट्याला येणाऱ्या प्रत्येक भूमिका तिने मोठ्या ताकदीने रुपेरी पडद्यावर साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली. किंबहुना ‘तुम्हारी सुलू’मधूनही ती एका ‘लेट नाईट रेडिओ शो’च्या आरजेच्या भूमिकेत दिसणार आहे. तेव्हा आता ही ‘सुलू’ तिच्या मादक आवाजाने कोणाची झोप उडवते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

फोटो गॅलरी: लिसा- झॅकचे पहिलेवहिले फोटोशूट…

First Published on November 14, 2017 11:42 am

Web Title: tumhari sulu movie bollywood actress vidya balan responds deftly to a shocking question by reporter on her weight