संततधार पाऊस आणि पंचगंगा, कृष्णा, वारणा नद्यांना आलेल्या महापुरामुळे सांगली आणि कोल्हापूर या दोन शहरांमध्ये मंगळवारी महापुराचा हाहाकार उडाला. कोल्हापूरच्या महापुराचा फटका टीव्ही मालिकेतील कलाकारांनाही बसला आहे. झी मराठी वाहिनीवरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेचं शूटिंग कोल्हापुरात सुरू आहे. या मालिकेचे कलाकार पुराच्या पाण्यात अडकले होते.

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेचे कलाकार जिथे राहतात, त्या इमारतीत पुराचं पाणी शिरलं. त्यामुळे राणा दा अर्थात हार्दिक जोशी आणि पाठक बाई अर्थात अक्षया देवधर, नंदिनी वहिनी अर्थात धनश्री काडगावकर या कलाकारांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागली. मालिकेतील सर्व कलाकार व क्रू मेंबर्स सुरक्षित असल्याची माहिती हार्दिक आणि अक्षयाने सोशल मीडियावर दिली.

वाचा : तुम्ही संकटात असताना नाटकाचा प्रयोग करणं योग्य नाही- सुबोध भावे

दरम्यान, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी प्रशासनाचे सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. लष्कर, नौदल आणि हवाईदलाची मदत घेतली जात आहे. आज (बुधवार) सकाळी सांगलीत मदत कार्यासाठी सैन्यदलाचे पथक दाखल झाले असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. कोल्हापूरमध्ये गोवा कोस्ट गार्डचे हेलिकॉप्टरसह एक पथक आणि नौदलाच्या दोन विशेष विमानातून २२ जणांचे पथक बोटीसह मदत कार्यासाठी दाखल झाले असल्याचे त्यांनी सांगितले.